मलकापूर : राजस्थानहून कोल्हापूरकडे निघालेल्या कारची त्याच दिशेला जाणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक झाली. या अपघातात कारमधील दोन वर्षांचा मुलगा, पाच वर्षांच्या मुलीसह सहाजण जखमी झाले. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. अपघातानंतर ट्रॅक्टर ट्रॉली नाल्यात जाऊन पलटी झाली. हा अपघात पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर आटके हद्दीत आज, शुक्रवारी पहाटेच्या सुमारास झाला.सरवणसिंग राजपूत (वय ३०), मफिकंवर राजपूत (३५) असे गंभीर जखमी झालेल्यांची तर मोडसिंग राजपूत (६०), दुर्गाकंवर राजपूत (५), भुपाल राजपूत (२), कुडाकर राजपूत (सर्व रा. भोकरा, ता. जालोर, राजस्थान ) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. अपघातातील जखमींवर कऱ्हाडच्या येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.अपघातस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कार (के.ए-१५-ए.ल-८६४०) मधून राजपूत कुटुंबीय राजस्थानहून कर्नाटकच्या दिशेने जात होते. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी मध्यरात्रीनंतर साडेतीनच्या सुमारास आटके हद्दीत ते आले असता चालकाचा कारवरील ताबा सुटला. त्याचवेळी कोल्हापूर दिशेलाच दोन ट्रॉली घेऊन निघालेल्या ट्रॅक्टर (एमएच -०९-सी-४९०५) च्या मागील ट्रॉलीला कारची पाठीमागून जोराची धडक झाली. धडक इतकी जोराची होती की, दोन्ही ट्रॉलीसह ट्रॅक्टर नाल्यात घुसल्याने एक ट्रॉली पलटी झाली. तर कारच्या समोरील बाजूचा चक्काचूर झाला.अपघाताची माहिती मिळताच महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचारी कुमार नायचल, विकास पाटील, नितीन विरकर, श्रीधर जाखले, आदित्य आडके, सुरज देवकर हे रुग्णवाहिकेसह तातडीने अपघातस्थळी दाखल झाले. अपघाताची माहिती कऱ्हाड तालुका पोलिसांसह महामार्ग पोलिसांना दिली. महामार्ग पोलिसांसह देखभाल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेतली. जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने रुग्णवाहिकेतून कृष्णा रुग्णालयात उपचाराकरिता पाठवले. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साह्याने बाजूला घेऊन महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.
ट्रॅक्टर ट्रॉलीला कारची पाठीमागून जोराची धडक, सहाजण जखमी; पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 5:16 PM