सातारा : समाजमाध्यमावरील अँपवरुन ऑनलाईन ट्रेडींगची माहिती मिळाल्यानंतर पैसे जमा केल्याने साताऱ्यातील महिला डाॅक्टरची सुमारे ३५ लाख रुपयांची फसवणूक झाली. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात तिघांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.पोलिसांच्या माहितीनुसार साताऱ्यातील एका महिला खासगी डाॅक्टरने तक्रार दिलेली आहे. त्यानुसार डाॅ. दिव्य माथूर, सहाय्यक जेसिका तसेच एक अनोळखी व्यक्त (पूर्ण नाव आणि पत्ता नाही) यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. दि. २३ जून ते ४ जुलै या कालावधीत हा प्रकार घडला. पोलिसांनी सांगितल्यानुसार तक्रारदार यांना समाजमाध्यमावरील एका अँपच्या माध्यमातून ऑनलाइन ट्रेडिंगसाठीची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी काही दिवस ऑनलाइन प्रशिक्षण घेतले. त्यानंतर मार्गदर्शन करणाऱ्यांनी काही निरोप द्यायचा असेल तर एक क्रमांक दिला होता.
यावर माहिती घेत असताना तक्रारदार यांनी राजस्थानमधील तसेच मुंबईतीलही एका बॅंकेच्या अकाऊंटवर ३५ लाख १० हजार रुपये जमा केले. त्यानंतर तक्रारदार महिला डाॅक्टरला जमा केलेली रक्कम काढून घ्यायची होती. त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. पण, त्यांच्या खात्यावर १७४ रुपये जमा झाल्याचे दिसून आले. तर उर्वरित ३५ लाख ९ हजार ८२६ रुपये रकमेची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पोलिसांत तक्रार दिली.सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. सहायक पोलिस निरीक्षक बिले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला आहे.