सागर चव्हाणपेट्री: कास पठार परिसरातील अतिदुर्गम पिसाडी (ता. जावळी) गावातील एका महिलेचा मृत्यू झाल्याने तिचा मृतदेह चादरीत गुंडाळून तो मृतदेह काठीला बांधून त्याची अक्षरशः कावड करत कित्येक मैल जंगलातून पायपीट करत मूळगावी पिसाडीला न्यावा लागला. रस्त्याअभावी मैलोनमैल पायपीट सुरू असून, अनेकविध समस्यांशी संघर्ष करत ग्रामस्थ खडतर आयुष्य जगत असून, गावापर्यंत रस्ता पोहोचावा, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.मृत जाईबाई तुकाराम मरागजे (वय ८०, पिसाडी) या उपचारासाठी आपल्या मुलीच्या गावी आल्या होत्या. याच गावी वृद्धापकाळाने त्यांचा मृत्यू झाला. यानंतर त्यांचा मृतदेह मूळगावी पिसाडी (कारगाव) येथे घेऊन जाताना हा सर्व खटाटोप करावा लागला.पिसाडी गावाला रस्ता मार्गाने जाण्यासाठी अंधारी-कास-जुंगटी ते कात्रेवाडी असा रस्ता आहे; पण कात्रेवाडीतून तीन किलोमीटरवर असलेल्या पिसाडी गावाला तेथून पुढे रस्ता नाही. त्यामुळे गावातील लोकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. मूलभूत गरजा भागविण्यासाठी ग्रामस्थांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्याअभावी या गावातील वयोवृद्ध, ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर परवड होताना दिसत आहे. या गावचा सर्व भाग जंगलाने व्यापला असल्याने याठिकाणी वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे ग्रामस्थांना रोजच जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. रस्त्याअभावी वाहतूक व दळणवळणासह अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने गावापर्यंत रस्ता पोहोचावा, अशी मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत...त्यामुळे गावांमध्ये सुविधा पुरवण्याबाबत दुर्लक्ष या गावातील काही लोकांचे येथून पुनर्वसन करावे, अशी मागणी आहे. तर काही लोकांना आपले मूळगाव सोडायचे नाही, असे समजते. त्यामुळे प्रशासनाची या गावांमध्ये नागरी सुविधा पुरवण्याबाबत दुर्लक्ष होताना दिसत आहे. एकविसाव्या शतकातही अजून अशी दृश्य पाहायला मिळत असल्याने याबाबत प्रशासकीय पातळीवर ग्रामस्थांच्या सोयीनुसार तोडगा काढणे गरजेचे आहे.
रस्त्याअभावी अनेक समस्येंशी संघर्ष!- पायवाटेच्या सर्वत्र झाडी व मोठ्या प्रमाणावरील गवतांमुळे बिबट्या, अस्वल, गवे या वन्य श्वापदांबरोबरच विषारी सर्पाची भीती.- आजारी व्यक्तीला उपचारासाठी व अत्यावश्यक सेवेसाठी मुख्य रस्त्यापर्यंत आणण्यासाठी कावड, डालग्याचा वापर.- दळणवळण व मालाची डोक्यावरून वाहतूक करून दीड ते दोन तास डोंगर चढउतार पायी प्रवास