सातारा : महामार्गालगत सर्व्हिस रस्त्यावर काम सुरू असताना बोरिंग मशीनमध्ये सापडून एका तरुण कामगाराच्या शरीराचे अक्षरश: तुकडे-तुकडे झाले. ही धक्कादायक घटना रविवारी रात्री उघडकीस आली. करुणेश कुमार (वय २९, रा. अतीत, ता. सातारा, मूळ रा. खरचाैली महाराज गंज उत्तर प्रदेश) असे मशीनमध्ये सापडून मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, महामार्गालगत खेड फाट्यावर गॅस पाइप टाकण्याचे काम सुरू आहे. करुणेश कुमार हा पोकलेन ऑपरेटर म्हणून त्या ठिकाणी कामाला होता. बोरिंग मशीनद्वारे खड्डा खणल्यानंतर तो खड्डा पाहण्यासाठी खाली उतरला होता. त्यावेळी तोल जाऊन त्या खड्ड्यात तो पडला. मात्र, तो खड्ड्यात पडल्याचे कोणाला दिसले नाही. ज्या खड्ड्यात तो पडला होता. तो खड्डा पुन्हा आणखी खोल खणण्यासाठी बोरिंग मशीन सुरू करण्यात आली. त्यामुळे त्याच्या शरीराचे अक्षरश: तुकडे-तुकडे झाले. हा प्रकार रविवारी दुपारी घडला. मात्र, ही घटना त्याच रात्री उशिरा उघडकीस आली. यानंतर कामगारांनी करुणेश कुमारच्या शरीराचा एक-एक तुकडा खड्ड्यातून बाहेर काढला. हा प्रकार नेमका कोणाच्या हलगर्जीपणामुळे झाला, हे अद्याप समोर आले नाही. करुणेश कुमारच्या मृतदेहाचे तुकडे जिल्हा शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशहून त्याचे नातेवाइक साताऱ्यात पोहोचले असून, नातेवाइकांनी अद्याप त्याचा मृतदेह ताब्यात घेतला नाही. या घटनेला कोण जबाबदार आहे, याबाबत संबंधित कंपनी आणि नातेवाइकांमध्ये चर्चा सुरू आहे. सातारा शहर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, हवालदार धनाजी यादव हे अधिक तपास करीत आहेत.