सातारा : येथील अजिंक्यतारा किल्ल्यावर एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली. आर्थिक विवंचनेतून संबंधित तरुणाने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रतीक सुरेश जमदाडे (वय २७, रा. इंगळेवाडी, पोस्ट नुने, ता. सातारा), असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
प्रतीक जमदाडे हा साताऱ्यातील शाहूनगरमध्ये राहत होता. बुधवारी सायंकाळी तो राहत्या घरातून अजिंक्यताऱ्यावर गेला. त्यावेळी त्याने घरातल्यांना व्हिडिओ कॉल करून मी आत्महत्या करत आहे, असे सांगितले. या प्रकारानंतर त्याच्या भावाने सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने शिवेंद्रसिंहराजे ट्रेकच्या जवानांना सोबत घेऊन अजिंक्यतारा किल्ला गाठला. तेथे गेल्यानंतर जवानांनी तसेच पोलिसांनी प्रतीकचा शोध घेतला.
मात्र, अंधार असल्यामुळे शोधमोहीम थांबवण्यात आली. दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी पुन्हा जवानांनी शोधमोहीम सुरू केली. त्यावेळी अजिंक्यताऱ्यावरील दाट झाडीमध्ये एका झाडाला त्याचा लटकलेल्या अवस्थेत मृतदेह निदर्शनास झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह झाडावरून खाली उतरण्यात आला. शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. आर्थिक विवंचनेतून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सातारा शहर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.