शिवथर : बोरखळ, ता. सातारा येथे झालेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान बैलाचा धक्का लागून तरुण खाली पडला. त्याच्या पोटावरून गाडीचे चाक गेल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी घडली. विनापरवाना बैलगाडा शर्यत आयोजित केल्याप्रकरणी मोन्या पाटील, ऋषीकेश नलवडे आणि रोहन पाटील यांच्यासह इतर जणांवर सातारा तालुका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुष्कर पवार (वय २१, रा. गणेशवाडी, ता. जि. सातारा) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा तालुक्यातील बोरखळ येथे गुरुवारी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. शर्यतीदरम्यान एक बैलगाडा चुकून चाकोरीच्या बाहेर आल्याने बाजूला उभ्या असलेला पुष्कर पवार याला बैलाचा धक्का लागला. त्यामुळे गाडीतून खाली पडला आणि अंगावरून चाक गेल्याने यामध्ये तो गंभीर जखमी झाला.यावेळी आयोजकांनी तातडीने त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे बोरखळ परिसरात खळबळ उडाली आहे. सातारा तालुका पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, रात्री उशिरापर्यंत कोणावरही गुन्हा दाखल झाला नव्हता.विनापरवाना बैलगाडा शर्यतीचे आयोजनपुष्कर पवार हा चालक आहे. स्पर्धेमध्ये गाडी पळवत असताना बैलाचा धक्का लागून तो खाली पडला. यावेळी बैलगाड्याचे चाक अंगावरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला होता. सध्या यात्रांचा माहोल असल्याने ठिकठिकाणी बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात येत आहे. बोरगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या शर्यतीसाठी परवानगी घेण्यात आलेली नव्हती, हे स्पष्ट झाले आहे.
बैलगाडा शर्यतीत बैलाचा धक्का लागून खाली पडला, पोटावरून चाक गेल्याने तरुणाचा जीव गेला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 4:55 PM