शिरवळ : हिमाचल प्रदेश येथील देवगडजवळील भाटग्रा, कुल्लू या ठिकाणी असणाऱ्या ऊझी घाटीतील डोभी परिसरात शिरवळ येथील उद्योजकांच्या मुलाचा अंदाजे पाचशे ते आठशे फुटावर पॅराग्लायडिंग करीत असताना सुरक्षिततेकरिता लावलेले बेल्ट उघडल्याने खाली पडून मृत्यू झाला. यात पायलटही गंभीर जखमी झाला आहे. सुरज संजय शाह (वय ३०, मूळ रा. शिरवळ, ता. खंडाळा, सध्या रा. बंगळुरू, कर्नाटक) असे मृताचे नाव आहे.मिळालेली माहिती अशी की, शिरवळ येथील उद्योजक संजय शाह यांचा आयटी इंजिनिअर असलेला मुलगा बंगळुरू येथील आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये २०१९पासून कार्यरत होता. कंपनीला नाताळ व नववर्षाची सुटी असल्याने तो कंपनीमधील मित्रांसमवेत हिमाचल प्रदेशातील कुल्लू मनाली येथे पर्यटनाकरिता गेला होता.देवगडजवळील भाटग्रा, कुल्लू या ठिकाणी ऊझी घाटीतील डोभी परिसरात हे सर्वजण शनिवार, दि. २४ रोजी फिरण्याकरिता गेले होते. तेथे पायलट विमल देवबरोबर पॅराग्लायडिंग करत असता अंदाजे पाचशे ते आठशे फुटांवर सुरज शाह व पायलटचा सुरक्षिततेकरिता लावलेला बेल्ट उघडला. यामुळे दोघेही खाली कोसळले. यात दोघेही जखमी झाले. या दुर्घटनेमुळे घटनास्थळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. दोघानाही कुल्लू येथील रुग्णालयात दाखल केले असता सुरजला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले, तर जखमी पायलट विमल देव याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधीक्षक गुरुदेव शर्मा यांनी भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या. यावेळी रविवारी शवविच्छेदन करून मृतदेह मित्रांच्या ताब्यात देण्यात आला, अशी माहिती नातेवाइकांकडून व मित्रांकडून देण्यात आली आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.शिरवळवर शोककळाशिरवळ परिसरात मितभाषी व्यक्तिमत्त्व व सामाजिक कार्यात अग्रेसर असे शाह कुटुंबीय आहे. सुरज शाह यांनीही कामातून मोठा मित्र परिवार निर्माण केला आहे. एकुलता एक मुलगा सुरज यांचे कुल्लू येथे अपघाती निधन झाल्याचे समजल्यावर शहा कुटुंबीय तसेच शिरवळवर शोककळा पसरली. सुरज शाह याच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे.
खासदार श्रीनिवास पाटील, सुप्रिया सुळेंचे मोलाचे सहकार्य उद्योजक संजय शहा यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची बातमी मिळताच सातारचे खासदार श्रीनिवास पाटील,बारामती खासदार सुप्रिया सुळे यांनी तातडीने शहा कुटुंबियांना सुरज याचा मृतदेह मिळण्यासाठी सर्व शासकीय सोपस्कार लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी युद्धपातळीवर यंत्रणा राबविली. सुरज याचा मृतदेह पुणे याठिकाणी विमानाद्वारे आणण्यात आला. तर याकामी उद्योजक परेश शहा यांचेही सहकार्य लाभले.