सातारा : येथील मध्यवर्ती बसस्थानकात एसटीत चढताना धक्का लागल्याने तरुणाला दोघांनी शिवीगाळ, धक्काबुकी केली. तसेच एकाने पाठीमागून डोक्यात चाकूने वार केला. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात अनोळखी दोघांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी वैभव हणमंत काटवटे (रा. भिवडी, ता. कोरेगाव) याने तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार १४ जून रोजी सायंकाळी सातच्या सुमारास सातारा मध्यवर्ती बसस्थानकाच्या फलाट क्रमांक सात येथे हा प्रकार घडला. यामधील तक्रारदार वैभव काटवटे हा घरी जाण्यासाठी फलाट क्रमांक सात येथे उभा होता. एसटी आल्यानंतर बसण्यास जात असताना एका अनोळखी तरुणाला त्याचा चुकून धक्का लागला. या कारणावरुन संशयिताने शिवीगाळ करत धक्का कशाला देतोस असे म्हणत त्याची काॅलर पकडली आणि धक्काबुकी सुरू केली. याचवेळी दुसऱ्या अनोळखी तरुणाने तुला जास्त मस्ती आली आहे असे म्हणत पाठीमागून वैभवच्या डोक्यात चाकूने वार केला. त्यामुळे वैभवच्या डोक्यात दुखापत होऊन रक्त येऊ लागले. याचदरम्यान, संशयिताने पुन्हा चाकू मारण्यासाठी उगारला. तेव्हा वैभवने वार अडविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्याच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली.तक्रारीनंतर सातारा शहर पोलिस ठाण्यात अनोळखी दोघांवर गुन्हा नोंद झाला आहे. हवालदार पोळ हे अनोळखींचा शोध घेत आहेत.
एसटीत चढताना धक्का लागला, रागातून दोघांनी तरुणावर चाकूने वार केला; सातारा बसस्थानकातील प्रकार
By नितीन काळेल | Published: June 16, 2023 1:23 PM