कातरखटाव : कणसेवाडी (ता. खटाव) येथील विजय महादेव डोईफोडे (वय ३४) याचा आधी गळा आवळून खून केला. त्यानंतर झाडाला लटकवून त्याने आत्महत्या केल्याचे भासवल्याचे वडूज पाेलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. हा खून वैयक्तिक वादातून झाला असून, याप्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. घटनास्थळाचा पंचनामा करत असताना ट्रॅक्टर टायरच्या नक्षीवरून पोलिस मारेकऱ्यापर्यंत पोहोचले. त्यामुळे या खुनाला वाचा फुटली.अधिक बाबा जाधव (वय ३८, रा. कणसेवाडी, खटाव) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.कणसेवाडी गावच्या डोंगराजवळील एका झाडाला विजय डोईफोडे याने दि. १६ जून सकाळी अकरा वाजता गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. वडूज पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता विजय डोईफोडे याच्या डोक्याला, कपाळावर जखमेच्या खुणा, छातीवर ओरखडलेले, मानेवर गळफासाचा व्रण तसेच हनुवटी पुढील बाजूस झुकलेली दिसली. पोलिस कर्मचारी शिवाजी खाडे व गणेश शिरकुळे यांना संशय आला. त्यांना घटनास्थाळापासून काही अंतरावर ट्रॅक्टरच्या टायरचे व्रण दिसले. यावरून पोलिसांनी तपास सुरू करून अवघ्या काही तासांत संशयित अधिक जाधव याला ताब्यात घेतले. त्याला पोलिसांनी खाक्या दाखविताच त्याने विजय डोईफोडे याच्या खुनाची कबुली दिली.विजय डोईफोडे हा गेल्या महिन्यामध्ये त्याच्या घराकडे गेल्याच्या कारणावरून अधिक जाधव त्याच्याशी भांडत होता, तसेच बाचाबाची करून बदनामी करत होता. याच रागातून त्याने दि. १५ जून रोजी रात्री आठ वाजता विजय डोईफोडे याला दारू पाजली व एनकुळ रोडला ट्रॅक्टरमधून नेले. निर्जन ठिकाणी लघुशंकेसाठी डोईफोडे याला ट्रॅक्टरमधून उतरण्यास सांगितले. तो बेसावध असताना त्याच्याच गळ्यातील शालीने जाधव याने गळा आवळून त्याला जिवे मारले. मृतदेह ट्रॉलीमध्ये टाकून कणसेवाडी डोंगराच्या कडेला आडरानात नेला. या ठिकाणी विजय डोईफोडे याचा मृतदेह अधिक जाधव याने खांद्यावर घेऊन पिंपरणीच्या झाडाला शालीने लटकवला. जेणेकरून त्याने आत्महत्या केली, असे त्याला भासवायचे होते. मात्र, पोलिसांच्या चाणाक्ष नजरेने या खुनाला वाचा फुटली.वडूज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अमोल माने, हवालदार शिवाजी खाडे, काॅन्स्टेबल गणेश शिरकुळे, मल्हारी हांगे, सत्यवान खाडे, कुंडलिक कटरे, सागर बदडे, किरण चव्हाण, पुष्कर जाधव, गजानन वाघमारे, अमोल चव्हाण यांनी हा गुन्हा उघडकीस आणला.
पोलिसांवर कौतुकाची थाप..खून करून गळफास बनावाची पोलखोल करून संशयितास तातडीने अटक केल्याप्रकरणी वडूज पोलिसांचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी काैतुकाची त्यांच्या पाठीवर थाप टाकत त्यांचा सत्कारही केला.