सातारा - सातारा रनर्स फौंडेशनच्यावतीने दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेला सकाळी साडे सहा वाजता सुरुवात झाली. या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी झेंडा दाखवून केले. या स्पर्धेमध्ये सात हजारांहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. दुर्दैवाने स्पर्धेमध्ये धावत असताना कोल्हापूरच्या राज पटेल या 32 वर्षीय स्पर्धकाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे.
मॅरेथॉन स्पर्धेचा प्रारंभ पोलीस परेड ग्राउंड येथून झाल्यानंतर ही स्पर्धा पोवई नाका, रयत शिक्षण संस्था, नगर परिषद, अदालत वाडा, समर्थ मंदिर, बोगदा, पॉवर हाऊस, यवतेश्वर घाटातून, हॉटेल निवांत, प्रकृती आयुर्वेदिक हिल रिसॉर्ट व नित्यमुक्त साई रिझॉर्ट पर्यंत जाऊन पुन्हा त्याच मार्गाने पोलीस परेड ग्राउंड अशी होत आहे. मात्र, या स्पर्धेदरम्यान, एका धावपटूचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली.
कोल्हापूर जिल्ह्यातील युवकाचा साताऱ्यात आयोजित केलेल्या मॅरेथॉन मध्ये धावताना मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मृत्यू झालेल्या स्पर्धकाला सातारा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात आयोजक आणि पोलीस देखील दाखल झाले असून मृत झालेल्या स्पर्धकांचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समजणार आहे. याच बरोबर इतर 3 स्पर्धक जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे धावपटू प्रेमी आणि स्पर्धा आयोजकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, स्पर्धा नियोजनबद्ध आणि सुरळीत पार पाडण्यासाठी सातारा रनर्स फौंडेशनच्यावतीने स्पर्धेच्या मार्गावर स्पर्धकांना पाणी,औषधे, बिस्कीटं, वेदनाशामक स्प्रे, कुलिंग स्टेशन इत्यादीची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पोलीस कर्मचाऱ्यांसाठी फूड पॅकेट्सची देखील व्यवस्था करण्यात आली होती. त्याशिवाय स्पर्धेच्या मार्गावर जर एखाद्या स्पर्धकाला जर काही त्रास झालाच तर त्या स्पर्धकाला त्वरित प्रथमोपचार कसा करता येईल इत्यादी आणि अशा प्रकारचे प्रशिक्षण सर्व स्वयंसेवकांना देण्यात आले आहे. जर त्यातून एखाद्या स्पर्धकाला जास्तच त्रास झालाच तर स्पर्धेच्या मार्गावर सुसज्ज अशा रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या. ज्यामुळे अशा स्पर्धकाला त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल करता येईल. साताऱ्यातील काही हॉस्पिटलमध्ये अशा बेड्स राखून ठेवल्या होत्या.