अजय जाधवउंब्रज : येथील संशोधक, इंजिनिअर सुमित डुबल या युवकाने नॅनो फायबर बनवलेय. पॉलिमर नॅनोफायबरचे कार्बन नॅनोफायबरमध्ये रूपांतर करून त्याचा उपयोग सुपर कपॅसिटरमध्ये इलेक्ट्रोड म्हणून केला आहे. या संशोधनाबद्दल त्याला पुणे येथील भारती विद्यापीठातर्फे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्याशाखेची पीएचडी पदवी प्रदान केली आहे.सुमित वसंतराव डुबल याचे मूळगाव कऱ्हाड तालुक्यातील राजमाची (सदाशिवगड) आहे; पण जन्मापासून हे कुटुंब उंब्रजमध्ये वास्तव्यास आहे. सुमितचे शालेय शिक्षण उंब्रज येथे झाले. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा साताऱ्यात केला. मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी आरआयटी साखराळे येथून पूर्ण केली. मेकॅनिकल इंजिनिअरिंग मास्टर डिग्री ही सिंहगड कॉलेज पुणे येथून पूर्ण केली. सध्या ते सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी पुणे येथे सहायक प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत.संपत चाललेले कच्च्या तेलाचे साठे आणि त्याच्या वापरामुळे निर्माण झालेली पर्यावरणाची हानी होत आहे. त्यामुळे जग अपारंपरिक ऊर्जा स्रोत आणि त्याचा वापरावर लक्ष केंद्रित करत आहे. ऊर्जा साठवणीवर अधिक संशोधन करणे गरजेचे आहे. जग इलेक्ट्रिक व्हेईकलच्या वापरावर जास्त भर देत आहे; परंतु बॅटरी आणि त्यात वापरण्यात येणाऱ्या मटेरियलच्या काही मर्यादा आहेत. त्यामुळे नवनवीन संशोधन करून बॅटरीबरोबरच सुपर कपॅसिटर तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. हेच लक्षात घेऊन सुमित डुबल यांनी या विषयांमध्ये संशोधन सुरू केले.नॅनोमटेरियल आणि त्याचा विद्युत ऊर्जा साठवण्यासाठी उपयोग हा त्यांचा संशोधनाचा विषय आहे. लिथियम हा बॅटरीमध्ये वापरण्यात येणारे मुख्य घटक आहे. भविष्यात ते संपुष्टात येणार आहे. बरेच शास्त्रज्ञ हे मल्टी फंक्शनल कॉम्पोझिट मटेरियलवर संशोधन करत आहेत. यावर सुमितने संशोधन करून भारती विद्यापीठ पुणे येथील नॅनोटेक्नॉलॉजी लॅबमधील इलेक्ट्रोस्पिनिंग या उपकरणाचा वापर करून नॅनो फायबर बनवले.त्या पॉलिमर नॅनोफायबरचे कार्बन नॅनोफायबरमध्ये रूपांतर केले. त्याचा उपयोग सुपर कपॅसिटरमध्ये इलेक्ट्रोड म्हणून केला. यशाबद्दल भारती विद्यापीठाचे सेक्रेटरी व प्रो-व्हाइस चान्सलर डॉ. विश्वजित कदम, प्रा. डॉ. सचिन चव्हाण, डॉ. स्वाती मुजुमदार, कुलगुरू डॉ. गौरी शिऊरकर यांनीही कौतुक केले आहे.सुमितचे शोधनिबंध.....संशोधनावर सुमितचे सात शोधनिबंध आंतरराष्ट्रीय नामांकित जर्नल आणि कॉन्फरन्समध्ये प्रकाशित झालेले आहेत. याबद्दल पेटंटही फाइल केलेले आहे. आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये बेस्ट पेपर प्रेझेंटेशनचा पुरस्कार मिळाला आहे. या संशोधनावर आधारित एक रिसर्च पेपर अमेरिकेतील कॉन्फरन्ससाठी निवडला गेला आहे.
मल्टी फंक्शनल कंपोझिट मटेरियल म्हणजे काय?
- जे मटेरियल एकाच वेळी दोन किंवा त्यापेक्षा जास्त कामासाठी वापरू शकतो. गाडीचे दरवाजे, बोनेट भविष्यात त्यांच्या मूळ हेतूबरोबर विद्युत ऊर्जाही साठवू शकतील.
- स्ट्रक्चरल सुपर कपॅसिटरचा उपयोग बॅटरीविरहित इलेक्ट्रिक व्हेइकल, मेडिकल इम्प्लांट, स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स, मानवरहित विमान, रोबोट, मिलिटरी उपकरणे यामध्ये होऊ शकतो.
संशोधन क्षेत्रात काम करताना खूप अडचणी येतात. योग्य मार्गदर्शन व संधी मिळाली तर संशोधन क्षेत्रात खूप पुढे जाऊ शकतात. या विषयांमध्ये पुढील संशोधन करून इलेक्ट्रिक व्हेईकलमध्ये याचा उपयोग करण्याचा मानस आहे. - सुमित डुबल, संशोधक इंजिनिअर