सातारा : आम आदमी पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र खजिनदार सरदार (सागर) भोगावकर यांनी कऱ्हाड येथे मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजितदादा गट) प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच त्यांना राज्यस्तरावर चांगली जबाबदारी देण्याबाबत आश्वासित केले.मागील अनेक वर्षे सागर भोगावकर हे ‘आप’चे जिल्ह्यात काम करत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी ‘आप’चा राजीनाम दिला होता. त्यामुळे ते कोणत्या पक्षात जाणार याकडे राजकीय वर्तूळाचे लक्ष होते. शेवटी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्याअजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष अमित कदम यांनी त्यांची व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घडवून आणली. या भेटीनंतर कऱ्हाड येथे १२ मार्चला महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीदिनाच्या कार्यक्रमादरम्यान पक्षप्रवेश घेण्याचे निश्चीत करण्यात आले. त्यानुसार मंगळवारी अजित पवार कऱ्हाडला आल्यानंतर भोगावकर यांचा पक्ष प्रवेश झाला.यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, कार्याध्यक्ष अमित कदम, सरचिटणीस श्रीनिवास शिंदे आदी उपस्थित होते.
Satara: सागर भोगावकरांच्या हातात 'झाडू'ऐवजी 'घड्याळ'; कऱ्हाडमध्ये अजित पवार यांच्याकडून स्वागत
By नितीन काळेल | Published: March 12, 2024 6:40 PM