सातारा : राज्यात सुरू असणा-या वॉटर कपचा आधारस्तंभ व अभिनेता आमिर खान कोरेगाव तालुक्यातील अनपटवाडीत मंगळवारी (27 मार्च) सकाळीच दाखल झाला आहे. या ठिकाणी वॉटर कपमधील कामाच्या डॉक्युमेंट्रीचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. यानंतर आमिर खान हा खटाव तालुक्यात जाऊन वॉटर कपचे काम पाहणार आहे. राज्यात तीन वर्षांपासून अभिनेता आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या वतीने वॉटर कप स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. या स्पर्धेतून अनेक गावे पाण्याबाबत स्वयंपूर्ण झाली आहेत. त्याच गावाच्या मार्गावर आणखी काही गावे जात आहेत. या स्पर्धेत सातारा जिल्ह्याचे मोठे काम झाले आहे. पहिल्यावर्षी स्पर्धेत कोरेगाव तालुक्यातील वेळू गावाने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला होता. तर दुस-यावर्षीही जिल्ह्यातील अनेक गावांनी राज्यात नावलौकिक मिळविला होता. त्यामुळे जिल्ह्यातील गावांची ही यशोगाथा सर्वदूर पोहोचली आहे.
त्यामुळे वॉटर कप स्पर्धेला सुरुवात होण्यास आणखी अवधी असतानाच अभिनेता आमिर खान सातारा जिल्ह्यात आला आहे. मंगळवारी सकाळी-सकाळीच तो अनपटवाडीत दाखल झाला. त्याच्याबरोबर सत्यजीत भटकळ, डॉ. अविनाश पोळ, कोरेगावच्या प्रांताधिकारी प्रांताधिकारी कीर्ती नलवडे, तहसीलदार स्मिता पवार, नायब तहसीलदार विठ्ठलराव काळे हेही आहेत. अनपटवाडीत वॉटर कप स्पर्धेत कामे झाली आहेत. त्याची पाहणी आमिर खानने केली. तसेच सरपंच मनोज अनपट व ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांच्याकडून माहिती घेतली. अनपटवाडीत जलसंधारणाच्या कामाचे चित्रीकरण करण्यात येणार आहे.