सातारा : सर्वसामान्य सातारकरांना गणेशोत्सवात बिनधास्तपणे फिरता यावे. गणेश देखावे पाहण्यासाठी बाहेर पडलेल्या महिलांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण व्हावी, यासाठी अंगावर वर्दी घालून कर्तव्य बजावत असलेले पोलिस कर्मचारी, होमगार्ड यांच्या हस्ते महाआरती करून साताऱ्यातील मानाचा प्रकाश मंडळाने सामाजिक बांधिलकी जपली आहे.गणेशोत्सवात सर्वच मंडळे राजकीय नेतेमंडळी, विविध खात्यांचे प्रमुख अधिकारी यांच्या हस्ते महाआरती केली जाते. साताऱ्यातील शेटे चौकातील मानाचा प्रकाश मंडळही महागणपतीची अकरा दिवस मान्यवरांच्या हस्ते आरती करते. पोलिसांवरील हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. तरीही मनोधैर्य खचू न देता सातारा शहरात गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत. अनेकजण गाव, घरदार सोडून नेमून दिलेल्या ठिकाणी कर्तव्य बजावत आहेत. एखाद्या ठिकाणी वरिष्ठांच्या हस्ते महाआरती होणार असेल तर हे मात्र चौकात उभे राहून वाहतूक नियंत्रित करतात. पोलिसांचे मनोधैर्य वाढविण्याच्या दृष्टीने एक दिवस पोलिसांच्या हस्ते आरती करण्याची संकल्पना मंडळाचे राहुल शेटे यांनी मांडली. मंडळाचे अध्यक्ष विष्णू देवधर व कुटुंब प्रमुख श्रीकांत शेटे यांना ही संकल्पना आवडली. ती प्रत्येक्षात आणण्यासाठी त्यांनी निर्णय घेतला.त्यानुसार गुरुवारी रात्री सात वाजता वाहतूक शाखेचे दोन, एक महिला पोलिस, एक महिला होमगार्ड व एक हवालदार या पाच जणांच्या हस्ते पूजा करण्यात आली. (प्रतिनिधी)गणपती पाहण्यासाठी येणाऱ्या भक्तांच्या सुरक्षेसाठी मंडळाच्या दारात पोलिस कर्तव्य बजावत असतात. अधिकाऱ्यांच्या हस्ते नेहमीच आरती केली जाते. यंदा या पोलिसांच्या हस्ते पूजा केल्याने त्यांचे मनोधैर्य वाढण्यास मदत होणार आहे. - श्रीकांत शेटे, कुटुंब प्रमुख, प्रकाश मंडळ, शेटे चौक, सातारा
मंडपाजवळच्या ‘खाकी’ला मिळाला आरतीचा मान
By admin | Published: September 09, 2016 12:24 AM