महाबळेश्वर : चार अल्पवयीन मुलांना मारहाण करून त्यांच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून महाबळेश्वर पोलिसांनी तीन तृतीयपंथीयांना अटक केली आहे. ही घटना शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास महाबळेश्वरमध्ये घडली.लक्ष्मण शंकर कल्लेमोर (वय ५०), बसुराज सायाप्पा कडमिची (वय २५), रमेश सिद्धराम टेकुल (वय २८, सर्व रा. यल्लाम्मा पेठ, कौतंम चौक, सोलापूर, सध्या रा. शेंडानगर चेंबूर मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या तृतीयपंथीयांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, महाबळेश्वर येथील बौद्धवस्तीमधील सात ते बारा वयोगटातील चार मुलांना या तृतीयपंथीयांनी मारहाण केली. त्यानंतर मुलांना पळवून नेत असताना मुलांनी त्यांच्या तावडीतून सुटका करून घेतली. शनिवारी भरदुपारी घडलेल्या या घटनेमुळे महाबळेश्वरात प्रचंड खळबळ उडाली.
मुलांनी या प्रकाराची माहिती घरी गेल्यानंतर पालकांना सांगितली. त्यानंतर पालकांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेऊन याची माहिती दिली. पोलिसांनीही तत्काळ या घटनेचे गांभीर्य ओळखून तृतीयपंथीयांचा शोध घेण्यास सुरूवात केली. त्यावेळी संबंधित तिघे तृतीयपंथी महाबळेश्वर बस स्थानकामध्ये सापडले.
पोलीस ठाण्यात नेऊन त्यांची चौकशी करण्यात आली. त्यांचा नेमका हेतू काय होता, हे अद्याप पोलिसांच्या तपासात समोर आला नाही. याबाबत साजिद वारूणकर (वय ५४, रा. स्कूल मोहल्ला, महाबळेश्वर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून तीन तृतीयपंथीयांवर अपहरण, मारहाण, संगनमत करणे, या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक सुरेखा चव्हाण या अधिक तपास करीत आहेत.