सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसकडून माढा मतदारसंघातून इच्छुक अभयसिंह जगताप यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर आपले बंड मागे घेतले आहे. यामुळे राष्ट्रवादीचा माढ्याचा तिढा सुटला आहे. तसेच शरद पवार यांना संकटाच्या काळात सोडणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत जगताप यांनी माढा मतदारसंघाबाबत भूमिका जाहीर केली. यावेळी संजय जगताप, विजय जगताप, किरण खवळे, अमर जगताप आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटातून उमेदवारी मिळेल म्हणून तीन महिन्यांपासून पूर्ण तयारी केली होती. यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचीही भेट घेतली होती. या भेटीत सकारात्मक चर्चा झाली. पण, भाजपचे सोलापूर जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून माढ्याची उमेदवारी मिळवली. त्यामुळे जगताप नाराज झाले होते. त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन बंडाचा झेंडा उभारला. पण, शरद पवार यांनी त्यांना भेटीस बोलावल्यानंतर दोघांत मतदारसंघ उमेदवारी तसेच विविध प्रश्नांवर चर्चा झाली. त्यावेळी जगताप यांनी कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करून दोन दिवसांत निर्णय घेण्याचे जाहीर केले होते. तसेच जगताप यांची प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबरोबरही बैठक झाली. त्यानंतर जगताप यांनी साताऱ्यात माढ्यातून उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही. राष्ट्रवादीबरोबर राहणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे माढ्यात राष्ट्रवादीचे उमेदवार धैर्यशील मोहिते यांच्यासमोरील संकट दूर झाले आहे. माढा मतदारसंघातही पक्षासाठी मोठे कष्ट घेतले. त्यामुळे राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळेल असे वाटले होते. मात्र, मोहिते-पाटील यांचा पक्ष प्रवेश झाल्यानंतर माझ्यासह कार्यकर्ते नाराज होते. यामुळे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याची कार्यकर्त्यांतून मागणी होती. पण, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट झाल्यानंतर निर्णय बदलला.
- अभयसिंह जगताप, प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस