सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या गळाला धैर्यशील मोहिते-पाटील लागल्याने माढ्याच्या उमेदवारीचा तिढा सुटला आहे; पण पक्षात बंडखोरी उफाळत असून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. यामुळे राष्ट्रवादी उमेदवाराची डोकेदुखी वाढणार आहे. यावर शरद पवार यांनाच तोडगा काढावा लागणार आहे.माढा लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासूनची आताची चाैथी निवडणूक ही महाविकास आघाडी आणि महायुतीसाठीही डोकेदुखी ठरलेली आहे. याला अनेक राजकीय कारणे आहेत. भाजपने खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने महायुतीत उठाव झाला. त्यातूनच भाजपचे सोलापूर जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते-पाटील बाहेर पडले. त्यांनी आता हाती तुतारी घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ते माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार असतील हेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील उमेदवाराचा तिढा सुटलेला आहे. कारण, पवार यांच्याकडे भाजप उमेदवाराला टस्सल लढत देणारा उमेदवार मिळाला आहे; पण यामुळेच आता राष्ट्रवादीतच बंडखोरीचा धोका उफाळून येत आहे. अभयसिंह जगताप हे निवडणूक लढविण्याच्या पवित्र्यात आहेत.राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघातील पक्षाचे तीन आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर गेले. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर तसेच मतदारसंघातील इतर नेत्यांनीही शरद पवार यांची साथ सोडली. अशा काळात मोजके नेते शरद पवार यांच्याबरोबर राहिले. त्यामध्ये अभयसिंह जगताप हे एक होते. मागील सहा महिन्यांपासून त्यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी तयारी केली होती. यासाठी मतदारसंघात विविध कार्यक्रम घेतले. उमेदवारीसाठी शरद पवार तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचीही भेट घेतली; पण त्यांना तुमचे नाव चर्चेत आहे एवढेच त्यांना सांगण्यात येत होते. प्रत्यक्षात पक्षीय पातळीवर वेगळेच विचार सुरू होते.त्यातच राष्ट्रवादीच्या गळाला धैर्यशील मोहिते लागल्याने त्यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे. यामुळे अभयसिंह जगताप हे दुखावलेत. तसेच राष्ट्रवादीतील इतर काही कार्यकर्तेही नाराज आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमधूनच जगताप यांना माढा निवडणूक लढण्यासाठी आग्रह होत आहे. या कारणाने जगतापही निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवाराची डोकेदुखी वाढणार आहे. हे राष्ट्रवादीसाठी तरी योग्य ठरणारे नाही.
निष्ठावंतांना डावलले; प्रस्थापितांना किंमत..
राष्ट्रवादीत अजून धैर्यशील मोहिते यायचे आहेत. त्यापूर्वीच त्यांच्यासमोर राष्ट्रवादीतील संकट उभे राहू लागले आहे. राष्ट्रवादीत चळवळीतील कार्यकर्त्यांना स्थान नाही. निष्ठावंतांना डावलले जाते आणि प्रस्थापितांना किंमत दिली जाते. ऐनवेळी प्रवेश करून त्यांचा विचार होतो. पक्षासाठी काम करून काही मिळत नाही, अशा प्रतिक्रिया राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांतून उमटू लागल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसने आमचे म्हणणे ऐकून घेतले नाही. आमच्या भावना विचारात घेतल्या नाहीत. त्यामुळे पक्षातील असंख्य कार्यकर्ते नाराज आहेत. कार्यकर्त्यांमधूनच आता निवडणूक लढविण्याची मागणी होत आहे. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा विचार केलेला आहे. पक्षाने अजूनही आमचा विचार करायला हवा. - अभयसिंह जगताप, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस