वाई : वाईच्या पश्चिम भागातील महत्त्वाच्या ग्रामपंचायतीमध्ये चुरशीच्या लढतीमुळे लक्षवेधी निवडणूक ठरलेल्या अभेपुरी ग्रुप ग्रामपंचायतीच्या निकालाकडे पश्चिम भागासह तालुक्याचे लक्ष होते. राष्ट्रवादीचा गड समजल्या जाणाऱ्या अभेपुरी गावात राष्ट्रवादीमधीलच दोन गटात चुरशीची लढत झाली. यामध्ये ग्रामविकास पॅनेलने बाजी मारली.
गावाचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून अशोक मांढरे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढविण्यात आली. या निवडणुकीत पाच जागांवर बाजी मारून विजयाची मोहोर लावली.
सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडीत सर्वानुमते सरपंचपदी सारिका भूषण मांढरे व उपसरपंचपदी स्वप्नील धोंडीराम पाचपुते, तर सदस्य म्हणून आप्पासाहेब व्यंकट मांढरे, विजय बाळासाहेब मांढरे, हेमा अनिल पवार यांची निवड करण्यात आली. ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा राष्ट्रवादीचाच झेंडा लागला आहे. पॅनेलप्रमुख अशोक मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील वाटचाल सुरू राहणार आहे.
यावेळी पॅनेल प्रमुख अशोक मांढरे म्हणाले, ‘आम्ही राष्ट्रवादीच्या विचारधारेवर चालणारे असून पुढील काळात आम्ही सर्वजण गावाच्या विकासासाठी तत्पर राहणार आहे. गावाची प्रगती साधत असताना गावातील रखडलेली कामे पूर्ण करण्यावर विशेष भर राहील. गावामध्ये मूलभूत सुविधा, जनहिताच्या योजना राबविण्याबरोबरच सर्व घटकांचे सक्षमीकरण यावरही विशेष परिश्रम घेतले जातील.
आमदार मकरंद पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. यावेळी नवनियुक्त सरपंच, उपसरपंच सदस्यांचा सत्कार मान्यवरांच्याहस्ते करण्यात आला.
फोटो २५अभेपुरी
अभेपुरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सारिका मांढरे, तर उपसरपंचपदी स्वप्नील पाचपुते यांची निवड झाल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अशोक मांढरे उपस्थित होते. (छाया : पांडुरंग भिलारे)