लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा पालिकेला मुख्याधिकारी कोण? या प्रश्नाला गुरुवारी पूर्णविराम मिळाला. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उपायुक्तपदासह अभिजित बापट यांच्याकडेच सातारा पालिकेच्या मुख्याधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. नगरविकास विभागाचे अवर सचिव सचिन सहस्रबुद्धे यांनी याबाबतचा नियुक्ती आदेश गुरुवारी काढला.
सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांची पिंपरी चिंचवड महापालिकेत उपायुक्तपदी पदोन्नतीने बदली झाली तर भोरचे मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात यांच्याकडे सातारा पालिकेची सूत्रे सोपविण्यात आली होती. नगरविकास विभागाने बदली आदेश काढल्यानंतर साताऱ्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. अभिजित बापट यांची बदली रद्द करण्यासाठी मंत्रालय स्तरावर जोरदार पाठपुरावाही करण्यात आला. या सर्व घडामोडी सुरू असतानाच अभिजित बापट यांनी पिंपरी चिंचवड आयुक्तांकडे आपले नियुक्तीपत्र सादर केले. मात्र, अद्याप त्यांच्याकडे कोणत्याही कार्यालयाची जबाबदारी सोपविण्यात आलेली नाही. तर डॉ. विजयकुमार थोरात साताऱ्यात येण्यापूर्वीच त्यांची पिंपरी चिंचवड महापालिकेत सहायक उपायुक्तपदी बदली झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले.
अभिजित बापट यांची घरवापसी होणार असल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू होती आणि ती खरी ठरली. नगरविकास विभागाचे अवर सचिव सचिन सहस्रबुद्धे यांनी अभिजित बापट यांच्याकडे सातारा पालिकेच्या मुख्याधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्याबाबतचा आदेश गुरुवारी काढला. त्यामुळे अभिजित बापट आता तीन दिवस पिंपरी तर दोन दिवस सातारा पालिकेतून कामकाज करणार आहेत. बापट यांना साताऱ्यात आणण्याची राजकीय खेळी यशस्वी झाली असली तरी आता बापट यांच्यावर कामाचा भारही वाढणार आहे. त्यामुळे अभिजित बापट ही जबाबदारी कशी पार पाडतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
लोगो : सातारा पालिकेचा फोटो