लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा पालिकेच्या बायोमायनिंग प्रकल्पाबाबत राजू गोरे यांनी नोंदविलेल्या तक्रारीवर मंगळवारी उपजिल्हाधिकारी (रोहयो) किरण कुलकर्णी यांच्या दालनात सुनावणी झाली. गोरे यांनी प्रकल्पातील चुकीच्या कामांचे सक्षम पुरावे उपजिल्हाधिकाऱ्यांपुढे सादर केले, तर हा प्रकल्प नियमानुसार असल्याचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणी आपण उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय गोरे यांनी घेतला आहे.
सातारा पालिकेच्या वतीने सोनगाव कचरा डेपोत उभारण्यात आलेल्या बायोमायनिंग प्रकल्पामध्ये तब्बल साडेतीन कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ‘नविआ’च्या नगरसेविका लीना गोरे यांचे पती राजू गोरे यांनी केला होता, तसेच या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी नगरपरिषद संचालनालयासह जिल्हा प्रशासनाकडे लेखी तक्रार अर्जाद्वारे केली होती. या तक्रारीवर उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी यांच्या दालनात मंगळवारी दुपारी बारा वाजता सुनावणी झाली. यावेळी मुख्याधिकारी अभिजित बापट, नगर अभियंता दिलीप चिद्रे, नगरसेवक अविनाश कदम, राजू भोसले आदी उपस्थित होते.
उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी यांनी प्रकल्पाची संपूर्ण माहिती जाणून घेतली. यावेळी राजू गोरे यांनी प्रकल्पातील चुकीच्या कामांचा पाढा वाचला. प्रकल्पाचे टप्पे, निविदा प्रक्रिया, सक्षम प्राधिकाऱ्याची चुकीच्या पद्धतीने केलेली नियुक्ती, आजवर काढण्यात आलेली बिले याबाबतचे सक्षम पुरावे गोरे यांनी सादर केले, तर मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी प्रकल्पाचे काम नियमांना धरून सुरू असल्याचे सांगितले. दरम्यान, सुनावणी पूर्ण झाल्यानंतर अविनाश कदम, राजू गोरे यांनी याप्रकरणी उच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती पत्रकारांशी बोलताना दिली.