सातारा : दहावी निकाल ऑनलाइन प्रसिद्ध झाल्यानंतर, विद्यार्थ्यांना लवकरच गुणपत्रक मिळणार आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशाची उत्सुकता लागली आहे. अकरावी प्रवेशासाठी आपल्या इच्छित महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी काही विद्यार्थी प्रयत्नशील आहेत, तर काहींनी सीईटीनंतर प्रवेश निश्चित करण्याचे ठरवले आहे.
दहावीचा निकाल लागल्यानंतर, महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये दांडगा उत्साह पाहायला मिळत आहे. कोविडमुळे घराबाहेर न पडलेले अनेक विद्यार्थी महाविद्यालय प्रवेशाची माहिती घेणे, कागदपत्रे गोळा करणे, अर्ज आणण्याचे कारण सांगून घराबाहेर पडू लागले आहेत.
निकाल लागल्यानंतर आठवड्याच्या आतच सीईटी प्रवेश परीक्षेचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरून घेतले जाणार आहेत. २१ ऑगस्ट रोजी ही सीईटी परीक्षा होणार आहे. सीईटी परीक्षा राज्य मंडळाच्या दहावीच्या इंग्रजी, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्रे या चार विषयांच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे. त्यामध्ये चार विषयांवर प्रत्येकी २५ गुणांचे प्रश्न असणार आहेत. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची सोय उपलब्ध आहे. फॉर्म भरण्याची मुदत २६ जुलैपर्यंत आहे.
महिन्यातच सीईटी!
दहावीची परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना मागील गुणांच्या आधारावर उत्तीर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे दहावीतील अभ्यास अभ्यासक्रम आपल्याला किती स्मरतोय, हे पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी सीईटीचा पर्याय निवडला आहे. बोर्डाने सरसकट उत्तीर्ण केलं असलं, तरीही आपल्या अभ्यासाची पातळी समजण्यासाठी ही सीईटी आत्मपरीक्षण करणारी परीक्षा ठरणार आहे.