लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : ध्वजनिधी संकलनात अंतिम कालावधीपूर्वीच अधिक उद्दिष्टपूर्ती केल्याबद्दल जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी विशेष पत्राद्वारे जिल्हा परिषदेचे कौतुक केले आहे. राष्ट्रीय कार्यामध्ये झेडपीने मोठा हातभार लावला आहे, अशा शब्दांत हे कौतुक आहे.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी अभिनंदनपर पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, तसेच सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांना पाठविले आहे. या पत्रामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, ‘जिल्हा परिषदेने नियोजनबद्ध प्रयत्नांनी ध्वजनिधी संकलनाचे उद्दिष्ट मुदतपूर्व शंभर टक्क्यांपेक्षा जास्त साध्य केले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने राज्यातील पर्यायाने देशातील माजी सैनिकांच्या कल्याण कार्यात बहुमोल योगदान दिले आहे. या प्रशंसनीय कार्याबद्दल जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि सर्व कर्मचाऱ्यांचे मी आभार मानतो आणि अभिनंदनही करतो. तसेच भविष्यातही अशीच कार्यतत्परता दाखवून जिल्हा परिषद ध्वजनिधी संकलनात उत्कृष्ट कार्य करेल, अशी अपेक्षा आहे.
दरम्यान, या अभिनंदनपर कौतुकामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळाले आहे. यापुढेही असेच कार्य जिल्हा परिषद करेल, अशी भावना मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांनी व्यक्त केले.
...................................