सातारा : अनोळखीने पाठवलेल्या लिंक ओपन करू नका, असे सायबर पोलीस वारंवार आवाहन करतायत. मात्र, याकडे नागरिक दुर्लक्ष करत असल्याने अनेकांना आर्थिक भुर्दंड बसत असल्याचे समोर आले आहे. साताऱ्यात अशाच प्रकारे लिंक ओपन करणे दोघांना भोवलं असून, त्यांच्या बॅंकेच्या खात्यातून ८२ हजार रुपये गायब झाले असल्याचे उघड झाले. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञातांवर गुन्हा दाखल झाला आहे.सुकेश श्यामराव पवार (वय ४६, रा. एमआयडीसी, कोडोली, सातारा, मूळ रा. पवाराची निगडी, ता. सातारा) हे शेती करून असून त्यांच्या मोबाइलवर अभिषेक शर्मा नावाच्या व्यक्तीने एक लिंक पाठविली. ही लिंक पवार यांनी क्लिक केली. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या खात्यातील ७४ हजार ५४१ रुपयांची रोकड अज्ञाताच्या अकाॅटवर ट्रान्सफर झाली. आपल्या खात्यातून पैसे कट झाल्याचे समजताच पवार यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
दरम्यान, अशाच प्रकारे दुसरी घटनाही घडली आहे. प्रमाेद जर्नादन बर्गे (वय ५२, रा. गुरुवार पेठ, सातारा, मूळ रा.चिंचणेर वंदन, ता.सातारा) हे सेंट्रल रेल्वेमध्ये इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतात. त्यांच्या मोबाइलवर एक लिंक आली. त्यांनीही आलेल्या लिंकवर क्लिक केले. त्यानंतर काही वेळातच त्यांच्याही अकाउंटवरून २८ हजार ७०० रुपयांची रोकड अज्ञाताच्या अकाउंटवर ट्रान्सफर झाली. हे दोन्ही गुन्ह्यांची सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली असून, पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर हे अधिक तपास करीत आहेत.