पेट्री (सातारा) : कासच्या विस्तृत पठारावर पसरलेली गर्द हिरवळ, ठिकठिकाणी फुललेले रानफुलांचे ताटवे, रस्त्याच्या कडेला कोसळणारे छोटे मोठे धबधबे, अधूनमधून पडणाºया पावसाच्या सरी अन् दाट धुके हे काल्पनिक वर्णन नव्हे तर कास पुष्प पठारावरील वास्तव मनोहारी दृश्य. निसर्गाचा हा अद्भूत नजराना अनुभवण्यासाठी देशभरातून पर्यटक दाखल होत आहे.
दुर्मिळ जीव-जंतू अन् निसर्गाच्या सौंदर्याने जागतिक वारसा स्थळाच्या यादीत स्थान पटकावलेल्या सातारा तालुक्यातील कास पठारावर पर्यटकांची हजारोंच्या संख्येने गर्दी होत आहे. फुलांचा बहर मोठ्या प्रमाणावर असून ठिकठिकाणी तेरडा, सीतेची आसवे, गेंद या फुलांचे गालिचे दिसत आहेत.
जैवविविधतेने नटलेल्या कास पठारावर फुलांचा हंगाम सुरू झाला आहे. देश विदेश तसेच राज्यभरातून पर्यटक मोठ्या संख्येने पर्यटनास येत आहेत. शनिवार, रविवार सलग सुटीच्या दिवशी कासला पर्यटकांची मोठया प्रमाणावर गर्दी होत आहे. रिमझिम पावसात भिजण्याबरोबरच पर्यटक कौटुंबिक सहलीचे क्षण कॅमेºयात टिपून ठेवत आहेत.
तसेच बहुतांशी शाळा, महाविद्यालयाच्या अभ्यास सहलींची संख्या वाढत आहे. पठारावर वीस ते पंचवीस प्रकारची फुले फुलली आहेत. चारचाकी, दुचाकी वाहनांच्या मोठया प्रमाणावर रांगा लागत आहेत.
पठारावर सद्या कापरू, टुथ ब्रश, दीपकांडी, रान महुरी, सीतेची आसवे, रानवांगे, गेंद, चवर, कापरू, निलिमा, अबोलिमा, सोनकी, आभाळी, न भाळी फूलांना चांगला बहर आला आहे. यामुळे हा परिसर मनमोहक बनला आहे.पठारावर देखरेख व मार्गदर्शनासाठी वनविभागाचे कर्मचारी तसेच कास, कासाणी, आटाळी, एकीव, पाटेघर, कुसुंबीमुरा, कार्यकारिणी समितीचे कर्मचारी, गाईड, सुरक्षा रक्षक उपस्थित आहेत.