लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सातारा शहरामध्ये गुरुवारी संपूर्ण दिवस बैठकांचे सत्र होणार आहे. विशेष म्हणजे खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे दोघे साताऱ्याबाहेर असतानाचा मुहूर्त राजधानीमधील गोपनीय बैठकीसाठी निवडण्यात आला आहे.
बैठकीचे स्थळ देखील गोपनीय ठेवले आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक, साताऱ्यासह जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुका या विषयावर बैठकीमध्ये सल्लामसलत केली जाणार आहे. या बैठकीसाठी प्रमुख नेतेमंडळींना बोलावणे धाडण्यात आले आहे. ९ सप्टेंबर रोजी दुपारी २ ते रात्री ९ पर्यंत विभागवार मॅरेथॉन बैठका घेतला जाणार आहेत.
जिल्हा मध्यवर्ती बँकेसह आगामी सर्वच निवडणुका भाजपच्या चिन्हावर लढण्यासाठी भाजपचे मूळ पदाधिकारी, नगरसेवक, पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे सदस्य इच्छुक आहेत. दोन राजे पक्षात नसतानाही भाजपने सातारा पालिकेमध्ये ६ नगरसेवक निवडून आणले होते. आता दोन राजे भाजपसोबत असतानाही त्यांचे एकमत दिसून येत नाही, तसेच भाजपच्या झेंड्याखाली निवडणुका लढविण्यासाठीही त्यांची बेगमी दिसत नसल्याने भाजपमध्ये अस्वस्थता आहे. ही अस्वस्थता गुरुवारी होणाऱ्या बैठकीत निघण्याची शक्यता आहे. दोन्ही राजे साताऱ्याबाहेर आहेत, त्यामुळे भाजपचे पदाधिकारी आपल्या मनातील भावना या बैठकीमध्ये त्वेषाने मांडणार आहेत.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी भाजपने रणशिंग फुंकले होते. मात्र, दोन्ही राजेंनी त्यासाठी उचल घ्यावी, ही भाजप नेत्यांची अपेक्षा होती. बँकेमध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे वजन असले तरी ते भाजपचे स्वतंत्र पॅनेल करण्यास उत्सुक नाहीत, तसेच खासदार उदयनराजे भोसले यांनी तर बँकेचे कामकाज चांगले सुरू असल्याचा ‘दाखलाच’ दिला. या परिस्थितीमध्ये राजेंची साथ मिळो अथवा न मिळो पण पुढे ‘चाल खेळण्याची’ तयारी भाजपने सुरू केलेली आहे.
या बैठकीला खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, मनोज घोरपडे, अतुल भोसले यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील काय आदेश देतात, याकडे भाजपच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
चौकट..
निरोप दिलाय आले तर ठीक...
जिल्ह्यातील भाजपच्या सर्व आमदार, खासदार, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीचे निरोप धाडण्यात आले आहेत. साताऱ्यातील दोन्ही वाड्यांवरदेखील निरोप पोहोचवले आहेत. दोन्ही राजे या बैठकीला आले तर ठीक नाही तर बैठक त्यांच्याविनाच घ्यायची हे भाजप नेत्यांचं ठरलं आहे.