सातारा : सातारा पालिकेची अंदाजपत्रकीय सभा शुक्रवारी (दि. २६) होणार असून, सभेपूर्वीच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अंदाजपत्रकाच्या आराखड्यातील गोषवारा पत्रकच गायब असल्याने नक्की किती कोटींच्या अंदाजपत्रकाला मान्यता दिली जाणार, याबाबत नगरसेवकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत आता विरोधक काय भूमीका घेतायत हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सातारा ही जिल्ह्यातील एकमेव ‘अ’ वर्ग नगरपालिका असून, पालिकेचा अंदाजपत्रक इतर पालिकांच्या तुलनेत सर्वात मोठे आहे. गतवर्षी पालिकेने २१२ कोटींचे अंदाजपत्रक सादर केले होते. लेखा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार हद्दवाढीमुळे यंदाचे अंदाजपत्रक २९८ कोटीवर पोहोचले आहे. या अंदाजपत्रकाला मान्यता देणारी विशेष सभा नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सकाळी अकरा वाजता होणार असून, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे हे अंदाजपत्रक ऑनलाइन सादर करणार आहेत.
दरम्यान, अंदाजपत्रकाच्या मांडणीत भांडवली जमा व खर्च, प्राप्त परिस्थितीत असणारी अखेरची शिल्लक यांचा ताळेबंद दर्शविणारे गोषवारा पत्रक नसल्याचे काही नगरसेवकांच्या लक्षात आले. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. गोषवारा पत्रक नसल्याने सभा नक्की किती कोटीच्या अंदाजपत्रकीय आराखड्याला मंजुरी देणार, याबाबत नगरसेवकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ही तांत्रिक चूक आहे की अन्य काय? याबाबत विरोधक काय? भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विकासकामांसाठी प्रशासनाने निधीची किती तरतूद केली आहे, सातारकांवर यंदा कराचा बोजा पडला आहे की नाही, याची नागरिकांना उत्सुकता लागली आहे.