सातारा : ‘गोरगरीब मागासवर्गीय लोकांवर अन्याय होत असताना अॅट्रॉसिटीचा कायदा रद्द करण्याची भाषा खासदार उदयनराजे करत आहेत. हे निषेधार्ह असून, उलट उदयनराजेंनीच राजकीय स्वार्थासाठी अॅट्रॉसिटीचा गैरवापर केला आहे,’ असा घणाघात ‘विद्रोही’चे पार्थ पोळके यांनी पत्रकार परिषदेत केला.पार्थ पोळके म्हणाले, ‘कोपर्डी येथील मुलीवर अत्याचार करून खून करणाऱ्यांना कायद्यानुसार शिक्षा व्हावी, अशी सर्वांचीच इच्छा आहे. मात्र, काहीजण आरोपींना माझ्या ताब्यात द्या, गोळ्या घालतो, अशी भाषा करत आहेत. अशा लोकांनी जरा बोलताना विचार करावा.अॅट्रॉसिटी कायदा रद्द करावा, अशी मागणी उदयनराजे वारंवार करताहेत. अॅट्रॉसिटी कायद्याचा उदयनराजेंनी गैरवापर केला की नाही? हे त्यांनी जनतेला सांगावे. देशात नव्हे महाराष्ट्रात एकाही मागासवर्गीयावर कधीच अन्याय होणार नाही, अशी खात्री मागासवर्गीय जनतेला द्यावी. पिढ्यान्पिढ्या तुमची सेवा, चाकरी करणाऱ्या गरिबांविषयी कशाला बोलता, असा प्रश्न उपस्थित करून पार्थ पोळके पुढे म्हणाले, ‘आपला इतिहास चाळा. जलमंदिर स्वच्छ करायचं काम आम्ही करायचो आणि करत आलो आहोत. थोरले प्रतापसिंह महाराज यांच्याबाबतीत जे घडलं. त्याविषयी उदयनराजेंना राग का येत नाही.गरीब मागासवर्गीय जनतेचे सुरक्षा कवच असलेल्या अॅट्रॉसिटीचा कायदा रद्द करण्याची भाषा बंद करावी. या कायद्याचा गैरवापर कोणी केला, हे जाहीर करावे,’असे आवाहनही पार्थ पोळके यांनी केले. (प्रतिनिधी)साताऱ्यात अॅट्रॉसिटी कायदा बचाव परिषदअॅट्रॉसिटीचा कायदा आणखीनच बळकट करावा तसेच सर्व समाजातील स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांना याच कायद्याने कारवाई करावी, या मागणीसाठी १६ आॅक्टोबर रोजी अॅट्रॉसिटी कायदा बचाव परिषद साताऱ्यात घेणार असल्याची माहितीही यावेळी पार्थ पोळके यांनी दिली. यावेळी दादा ओव्हाळ, उमेश चव्हाण, संजय गाडे, राजेंद्र कांबळे, काका गाडे, गौतम वाघमारे, गणेश कारंडे आदी उपस्थित होते.
उदयनराजेंकडूनच अॅट्रॉसिटीचा गैरवापर : पार्थ पोळके
By admin | Published: September 30, 2016 11:56 PM