वडूज : येथील नाथ मंदिरासमोर सुरु असलल्या महिला मेळाव्यात महिलांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी दोघांविरोधात वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित आरोपींना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी आंधळी गणाचे पंचायत समिती सदस्य शेखर गोरे, तसेच समर्थकांनी पोलीस ठाण्यात सुमारे चार तास ठिय्या मांडला. पोलिसांना मिळालेल्या माहिती अशी, वडूज येथील आठवडा बाजारादिवशी शेखर गोरे प्रतिष्ठानच्या वतीने हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केले होते. साडेअकराच्या सुमारास डॉ. महेश गुरव, अक्षय शामराव जाधव हे दोघे नाथ मंदिरात गेले. त्यांनी वडूज येथे असला कार्यक्रम कशाला घेताय, असे म्हणत काही महिलांशी गैरवर्तन केले. तसेच एका महिलेच्या गळ्यातील दोन तोळे सोन्याची चेन हिसकावून नेली. हा वाद सोडविण्यासाठी गेलेल्या महमंद शिकलगार यालाही जबर मारहाण केली. हा प्रकार घडल्यानंतर गुरव आणि जाधव दुचाकीवरून पळून गेले. या प्रकाराची माहिती महिलांनी माण पंचायत समितीचे सदस्य शेखर गोरे यांना सांगितली. त्यानंतर शेखर गोरे कार्यकर्त्यांसह पोलीस ठाण्यात दाखल झाले. आरोपींना तातडीने अटक करावी, अशी मागणी करीत उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना त्यांनी घेरावो घातला. तसेच चार तास ठिय्या मांडला. दरम्यान या प्रकरणी वडूज पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. याप्रकरणी एका महिलेने तक्रार दिली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, संदीप निवृत्ती गोडसे, चंद्रकांत यशवंत गोडसे (रा. वडूज), गणेश किसन सत्रे (रा. स्वरपखानवाडी ता. माण), गोरख मदने (रा. महिमानगड ता. माण) या चौघांनी घरात घुसून महिलेला मारहाण केली. तसेच त्यांच्या गळ्यातीतल अर्धा तोळे मंगळसूत्र हिसकावून नेले. तसेच गैरवर्तन करून काठी व तलवारीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर ते पळून गेले. (प्रतिनिधी)राजे-महाराजांच्या नावावर राजकारण -गोरेयावेळी गोरे म्हणाले, पोलिसांचा नाकर्तेपणा व बघ्याची भूमिका घेण्यामुळेच खटाव, माण तालुक्यांत महिला असुरक्षित झाल्या आहेत. तर बेकायदेशीर दारूधंदे, जुगार, ङ्कमटका वाढला आहे. राजे-महाराजे व आमदार, खासदारांची नावे सांगून काही लोक अशा बेकायदेशीर धंद्यांना पाठबळ देत आहेत. पोलीसांनी त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी अन्यथा त्यांना वठणीवर आणण्यासाठीच आपण आपल्या पद्धतीने धडा शिकवू.
वडूजच्या महिला मेळाव्यात गैरवर्तन ; दोघांवर गुन्हा
By admin | Published: August 31, 2014 12:14 AM