लोणंद : लोणंद नगरपंचायतीच्या घरपट्टी वसुली पथकातील कर्मचाऱ्यांना मंगळवार, दि. २ रोजी धक्काबुक्की व शिवीगाळ करण्याचा प्रकार घडला असून, याबाबत शिवाजी रामचंद्र शेळके यांनी लोणंद पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे.
याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, मंगळवार, दि. २ रोजी दुपारच्यावेळी नगरपंचायत कर्मचारी शिवाजी शेळके, हनुमंत माने, पांडुरंग शेळके, शंकर शेळके, विजय बनकर, निशा फडतरे, शाहीन सय्यद, रामदास तुपे, वसंत शेळके, राजेंद्र शेळके हे कर्मचारी घरपट्टी वसुलीसाठी बाबूलाल शहा यांच्या घरी गेले होते. कर्मचाऱ्यांनी शहा यांना त्यांच्या राहत्या घराची मागील सहा वर्षांची थकीत एकूण घरपट्टी व पाणीपट्टी ४३ हजार १४८ रुपये असल्याचे सांगितले. तसेच त्यांना याबाबत लेखी थकीत बिल देऊन थकीत बाकी भरण्याबाबत सांगितले असता बाबूलाल शहा यांनी व त्यांचा मुलगा अभय शहा यांनी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून शिवाजी शेळके, विजय बनकर, रामदास तुपे यांना धक्काबुक्की केली व नंतर सर्व कर्मचाऱ्यांना कंपाऊंडच्या आतमध्ये घेऊन लोखंडी गेटचे कुलूप लावले. कर्मचाऱ्यांना दमदाटी करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश माने करीत आहेत.