मलटण : फलटण ते सुरवडीदरम्यान पुणे-पंढरपूर महामार्गावर तांबमाळ येथे वेड्या बाभळीची व इतर झाडे खूप वाढलेली आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करताना झाडांच्या फांद्या आडव्या येऊन वाहनचालकांना फटकारे बसत आहेत. रात्रीच्या वेळी अचानक या काटेरी फांद्या आडव्या आल्याने वाहन चालकांची तारांबळ उडालेली दिसते. अनेक वेळा वेगात येणाऱ्या वाहनांना या फांद्यांचा प्रसाद खावा लागतो.
पुणे-पंढरपूर हा नेहमी वाहतुकीने गजबजलेला महामार्ग आहे. फलटण व सुरवडी या ठिकाणी सुरवडी औद्योगिक वसाहतीमुळे वाहनांची वर्दळ जास्तच असते. असे असतानाही महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाढलेली ही झुडपे, काटेरी बाभळी प्रवाशांना त्रस्त करीत आहेत. वास्तविक, महामार्ग व रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेल्या झाडांची सफाई करण्यासाठी मैलकोला करत असत. परंतु सध्या या विभागात कर्मचारी भरती होत नसल्याने देखभाल दुरुस्तीही बांधकाम विभागाकडे आहे. बांधकाम विभागाकडे या रस्त्यांची दुरुस्ती व देखभाल असताना या वाढलेल्या झाडांकडे संबंधित विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. वेगाने येणाऱ्या वाहनांना रात्रीच्या अंधारात यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. फलटण-सुरवडी दरम्यान महामार्गाच्या दुतर्फा वाढलेली झुडपे त्वरित काढावीत, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे
चौकट :
तांबमाळ येथील एका कृषी संशोधन संस्थेच्या समोर वाढलेल्या काटेरी झुडपांनी महामार्गाची एक लेन पूर्ण बंद झाली आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.
100821\img_20210810_155742871.jpg
तांबमाळ येथे पुणे पंढरपूर महामार्गावर अर्ध्या रस्त्यावर काटेरी बाभळी वाढल्या आहेत