मसूर : ‘कोरोनाच्या काळात दीड वर्षापासून थांबलेले शैक्षणिक विचारमंथन चर्चासत्र या वर्षी न थांबवता जिल्हा मुख्याध्यापक संघाने आभासी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने घेतले. तीन दिवसीय शैक्षणिक चर्चासत्र महाराष्ट्र राज्याला दिशादर्शक ठरेल,’ असे प्रतिपादन पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी केले.
चर्चासत्राच्या सांगते दिवशी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या वेळी कोल्हापूरचे विभागीय मंडळाचे सचिव देविदास कुलाळ, उपशिक्षणाधिकारी श्रीकांत जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. सकाळच्या सत्रात नागझरी हायस्कूलचे मुख्याध्यापक अवधूत चेंडके यांनी शिक्षणाच्या नवीन ऑनलाइन वाटा या शोधनिबंधाचे वाचन केले. तर माजी मुख्याध्यापक ए. एल. देशमुख व माजी सचिव शहाजी ढेकणे यांचे व्याख्यान झाले.
तीन दिवसीय चाललेल्या या ज्ञानयज्ञात पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगांवकर, कोल्हापूरचे शिक्ष्ण निरीक्षक डी. एस. पोवार, शिक्षणतज्ज्ञ डॉ. बी. एम. हिर्डेकर, शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष जे. के. पाटील, मुख्याध्यापक महामंडळाचे माजी सचिव अरुण थोरात, पुणे विभागाचे माजी शिक्षणाधिकारी प्रकाश परब यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक संघाकडून दिला जाणारा यंदाचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार कुसुंबीचे मुख्याध्यापक अंबादास पाटील, भिलारचे मुख्याध्यापक प्रकाश बेलोशे यांना देण्यात आला.
अध्यक्ष सचिन नलवडे म्हणाले, ‘मुख्याध्यापक संघातर्फे अनेक उपक्रम राबवले आहेत. दीड वर्षापासून कोणतेही चर्चासत्र होऊ शकले नाही. म्हणून या वर्षीचे अधिवेशन मुख्याध्यापक संघातील सर्वांच्या सहकार्याने आभासी तंत्रज्ञानाचे साहाय्याने घेण्यात येत आहे.’
कोट-
महाराष्ट्र शासनाने मुख्याध्यापक व शाळांचे खासगी संस्थेकडून मूल्यमापन करण्याचा घातलेला घाट कदापि यशस्वी होऊ देणार नाही. हा निर्णय शासनाने त्वरित मागे घेतला नाही तर त्यासाठी तीव्र आंदोलन छेडले जाईल. तसेच आमचे शिक्षक फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करत आहेत, त्यांचे शंभर टक्के लसीकरण करा, अशी मागणी आमदार जयंत आसगांवकर यांनी केली.