सातारा : जिल्ह्यात कोरोना विषाणूचे संकट असलेतरी ग्रामीण भागातील शेतकरी सध्या खरीप हंगामपूर्व मशागतीच्या कामात गुंतले आहेत. रानातील घाण काढणे, नांगरणी करणे, खत विस्कटणे आदी कामांना वेग आला आहे. मान्सूनच्या पावसापूर्वी शेतातील कामे उरकून घेण्याच्या मागे शेतकरी लागले आहेत.
सातारा जिल्ह्यात खरीप हंगाम हा महत्त्वाचा समजला जातो. जिल्ह्यातील खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र हे साडेतीन लाख हेक्टरच्या वर आहे. यामध्ये सोयाबीन आणि बाजरीचे क्षेत्र अधिक आहे. तर भात, भुईमूग, ज्वारी, मका, घेवडा तसेच कडधान्येही जिल्ह्यात घेतली जातात. सध्या पावसाळा तोंडावर आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामपूर्व शेतातील कामांना वेगाने सुरुवात केली आहे. शेत शिवारात सर्वत्र शेतकरी आणि मजूर दिसून येत आहेत.
जिल्ह्यात सध्या नांगरणी, ढेकळे फोडणे, खत ओढणे आणि विस्कटणे अशी कामे सुरू आहेत. तसेच काही शेतकऱ्यांनी बियाणांची जुळवाजुळव सुरू केली आहे. पाऊस पडला की लगेच पेरणीला सुरुवात करता येईल यादृष्टीने शेतकऱ्यांनी तयारी केली आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात भात, सोयाबीन, भुईमूग अशी पिके प्राधान्याने घेण्यात येतात. तर पूर्व दुष्काळी भागात बाजरी हेच मुख्य पीक राहते. तर मका पीक काही प्रमाणात घेतले जाते. यावर्षी वेळेत मान्सून सुरू झाला तर पेरण्यांनाही वेग येणार आहे.
.........................................................................