खटाव : शेतकरी आता खरिपाच्या पेरणीपूर्व मशागतीमध्ये व्यस्त दिसून येत आहे; तर दुसरीकडे मध्यंतरी झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी बांध वाहून गेल्यामुळे त्या बांधाची दुरुस्ती करण्याची लगबग शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे.
राज्यातील नागरिक कोरोना विषाणूपासून सुरक्षित राहावेत, यासाठी लावलेल्या टाळेबंदीमुळे शेतकरी मागील एक महिनाभर घरामध्येच राहून शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत होता. मात्र, कृषिक्षेत्राला काही नियम व अटी लागू करून शासनाने काही निर्बंध शिथिल करून शेतीची कामे आणि शेतीपूरक उद्योग सुरू करण्याला मान्यता दिल्यामुळे शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त आहे.
खटावमध्ये शेतीच्या मशागतीबरोबरच बांधाची डागडुजी करणेदेखील तितकेच महत्त्वाचे असल्यामुळे जेसीबीच्या साहाय्याने ही कामे लवकर उरकून घेण्याच्या शेतकऱ्यांच्या धावपळीला आता वेग आला आहे. कोरोनाचे संकट असले तरी शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीपूर्वी शेताची डागडुजी व पेरणीपूर्व मशागत करण्यास सुरुवात केली आहे. मध्यंतरी आधी पडत असलेल्या पावसामुळे परिसरातील शेतकरी खरीप पेरणीपूर्व मशागतीच्या कामांत व्यस्त आहे. परंतु कधी ऊन, कधी पाऊस या वातावरणामुळे शेतकरी संभ्रमावस्थेत असला तरी दरवर्षीप्रमाणे बी-बियाणे खरेदी करीत असताना मात्र त्याची आर्थिक गणित कोलमडण्याची त्याला भीती आहे. म्हणूनच बहुतांश शेतकरी घरगुती म्हणजेच यापूर्वी शेतात पिकविलेल्या बियाण्यांचा वापर करण्यास पसंती देत आहेत.
खरिपाची पेरणी करण्याची लगबग लवकरच सुरू होईल. त्यामुळे आता शेतकरी पेरणीपूर्व मशागतीमध्ये व्यस्त झाला आहे. मागील वर्षापासून नैसर्गिक आपत्तीबरोबरच कोरोनाशी झुंज देत असलेला शेतकरी एका नव्या उमेदीने शेतीकामात व्यस्त झाला आहे. नैसर्गिक संकटाशी झुंज देत शेतकरी पुन्हा खरिपाच्या पेरणीचे नियोजन करीत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसून येत आहे.
चौकट...
गेल्या वर्षीपासून कोरोनाच्या विषाणूमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहेच. त्याचबरोबर आर्थिक घडीही विस्कटली आहे. अशातच शेतकऱ्यांचेही अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे त्याला या आर्थिक परिस्थितीशी सामना करीत असताना शेतीच्या मशागतीची कामे करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. कोरोनामुळे संचारबंदी व लॉकडाऊन असला तरी तोंडावर येत असलेल्या खरीप हंगामासाठी कोरोनाला दूर ठेवत शेतकरी खरीप पेरणीच्या पूर्वमशागतीच्या कामात स्वतः आणि सोबत मजुरांना घेऊन शेतीमधील तण, कचरा वेचणे, शेणखत टाकणे, फणपाळी मारणे, आदी कामांत व्यस्त दिसून येत आहे.
०९खटाव
कॅप्शन : खटाव तालुक्यात खरीप पेरणीपूर्वी शेतातील बांधदुरुस्तीच्या कामात शेतकरी व्यस्त आहेत.