सातारा : सातारा पालिकेने आरोग्य विभागातील १२ ठेक्यांसाठी निविदा मागविल्या होत्या. या ठेक्यांसाठी तब्बल ५१ निविदा पालिकेकडे दाखल झाल्या आहेत. या निविदा सर्वसभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असून त्यानंतरच निविदांवर अंतीम निर्णय घेतला जाणार आहे. भूमीपूत्र मजूर सहकारी संस्थेने सर्वाधिक १२ निविदा भरल्या आहेत. त्याखालोखाल गरुडझेप स्वयंरोजगार, ओमशांती महिला स्वयंरोजगार, कर्तव्य स्वयंरोजगार या तीन सहकारी संस्थांनी प्रत्येकी ११ निविदा भरल्या आहेत. महालक्ष्मी मजूर सहकारी संस्था व पद्मावती मजूर सहकारी संस्था या दोन संस्थांनी प्रत्येकी २ निविदा भरल्या आहेत. प्रतापसिंह मजूर सहकारी संस्था, कोरेगाव विभाग कामगार विकास सेवा , गुरुकृपा सहकारी संस्था या तीन संस्थांनी प्रत्येकी एक निविदा सादर केली आहे. वार्षिक ७0 लाख रुपये या दराने हे ठेके देण्यात येणार आहेत. शहरातील स्वच्छतेसाठी पालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारीवर्ग तुटपुंजा पडत असल्याने पालिका ठेकेदारी पध्दतीने स्वच्छतेची कामे करुन घेते. काही दिवसांपूर्वी हे ठेके वादाच्या भोवऱ्यात साठले होते. मुख्याधिकाऱ्यांनी प्रत्येक संस्थेची केवायसी कागदपत्रे मागवून घेतली होती. एका संस्थेने बोगस पॅनकार्ड दिल्याने ही ठेकेदारी वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. (प्रतिनिधी)आचारसंहितेचा अडसरविधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकते, अशी परिस्थिती आहे. पालिकेची सर्वसाधारण सभा कधी घेणार, याचा निर्णय शुक्रवारपर्यंत झाला नव्हता. आचारसंहिता लागली तर हे ठेके लटकू शकतात. अनंत चतुर्थीनंतर केव्हाही आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने हे ठेके लटकण्याचीच चिन्हे निर्माण झाली आहेत. त्यामुळे अनेक जण अस्वस्थ झाले आहेत.
बारा ठेक्यांसाठी एकाव्वन निविदा
By admin | Published: September 05, 2014 9:33 PM