शिरवळ : आशियाई महामार्ग ४७ वरील खंबाटकी घाटामध्ये मृत्यूचे वळण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एस कॉर्नरलगत कंटेनर पलटी झाल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहतूक सुरळीत करत असताना पाठीमागून ब्रेक निकामी झाल्याने भरधाव वेगाने आलेल्या मालट्रकने महामार्गावरअपघात झाल्याने थांबलेल्या वाहनांना धडक दिली. वाहनामध्ये अडकल्याने भुईंज महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस हवालदार गंभीर जखमी झाले आहे. हा अपघात रविवारी सकाळी आठच्या सुमारास घडला आहे.
सुनील विठ्ठल शेलार असे जखमी हवालदाराने नाव आहे. घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आशियाई महामार्ग ४७ वर असणाऱ्या खंबाटकी घाटामध्ये रविवारी सकाळी आठच्या सुमारास एस कॉर्नरलगत कंटेनर (एमएच ०६ एक्यू ८९२३) हा भरधाव वेगाने येत असताना चालकाचे नियंत्रण सुटून महामार्गावर पलटी झाला. अपघातामुळे घाटातील वाहतूक विस्कळीत झाली.
अपघाताची माहिती मिळताच खंडाळा पोलीस व भुईंज पोलीस महामार्ग केंद्राचे पोलीस कर्मचारी तातडीने दाखल होत महामार्गावरील विस्कळीत वाहतूक करण्यासाठी महार्गावर पलटी झालेला कंटेनर क्रेनच्या साहाय्याने बाजूला घेत होते. पंधरा मिनिटांच्या कालावधीनंतर पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या मालट्रक (केए २६ ६४४७) चे ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाला.
महामार्गावर उभे असलेल्या सात ते आठ वाहनांना विचित्रपणे धडक दिली. यावेळी त्याठिकाणी वाहतूक सुरळीत करत असलेले भुईंज महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस हवालदार सुनील शेलार हे वाहनामध्ये अडकले जाऊन वाहनांची धडक बसल्याने गंभीर जखमी झाले. गंभीर जखमी सुनील शेलार यांना तातडीने खंडाळा पोलिसांनी व भुईंज महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने रुग्णवाहिकेतून सातारा येथील रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. त्यांना अधिक उपचाराकरिता पुणे याठिकाणी असणाऱ्या रुग्णालयामध्ये दाखल कारण्याची प्रक्रिया सुरु आहे.