वेळे : भोर येथून ऑक्सिजन लावून एका कोरोना बाधित रुग्णाला घेऊन वाईकडे निघालेल्या रुग्णवाहिकेला अपघात झाला. हा अपघात पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटात सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास झाला. पोलिसांनी दुसरी रुग्णवाहिका बोलावून उपचारासाठी पाठविले.
याबाबत माहिती अशी की, भोर येथील एका कोरोना बाधित रुग्णाची ऑक्सिजन लेवल कमी असल्याने त्याचे प्राण वाचविण्यासाठी भोर येथील डॉक्टरांनी त्याला अधिक चांगल्या उपचारासाठी व्हेंटिलेटरची गरज असल्यामुळे वाईच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी पाठविले होते. संबंधित कोरोना बाधित रुग्णाला ऑक्सिजन लावून रुग्णवाहिका (एमएच ०१ बीएस ०११३) वाईकडे भरधाव निघाली होती. रुग्णवाहिका सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पुणे - सातारा महामार्गावर खंबाटकी घाटाच्या मध्यभागी आली असता नुकत्याच पडलेल्या पावसाच्या पाण्यामुळे रस्ता निसरडा झाला होता. त्यामुळे चालक सागर अलगुडे यांचा रुग्णवाहिकेवरील ताबा सुटल्याने रुग्णवाहिका डोंगरकड्यावर जाऊन आदळली. त्यानंतर ती पलटी झाली.
अपघातग्रस्त रुग्णवाहिकेतील कोरोना बाधित रुग्ण गाडीतच मार लागलेल्या अवस्थेमध्ये पडून राहिला. ‘मला वाचवा,’ असे तो ओरडत होता. मात्र, त्याचा आवाज आधीच खोल गेल्याने तो बाहेरील लोकांना ऐकू येत नव्हता. अपघाताची माहिती खंडाळा पोलीस ठाणे आणि जोशी विहीर येथील महामार्ग पोलिसांना समजताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दुसरी रुग्णवाहिका मागवून हा रुग्ण वाईच्या खासगी हॉस्पिटलकडे रवाना केला. या अपघाताची नोंद खंडाळा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
अभिनव पवार यांनी फोटो मेल केला आहे.