वेळे : कारचा टायर फुटल्याचे पाहून सेवारस्त्यावर आपल्या तीन दुचाकी पार्क करून सुरूर येथील युवक कारचालकाला मदत करण्यासाठी गेले होते. याच दरम्यान महामार्गावरून आलेली पोलीस गाडी या तीन तरुणांच्या दुचाकीवर आदळल्याने या दुचाकींचे नुकसान झाले असून एक युवक जखमी झाला आहे. हा अपघात गाडीचा टायर फुटल्याने झाला असल्याचे समोर येत आहे.शिवाजी विद्यालय सुरूर समोरील उड्डाणपुलानजीक असलेल्या खराब रस्त्याच्यामुळे या आठवड्यात या ठिकाणी चौथा अपघात झाला आहे. सुरूर ता. वाई येथील वीरबागनजीक असलेल्या हायस्कूल समोरील उड्डाणपुलाच्या आसपासचा रस्ता हा गेले कित्येक महिने अत्यंत खराब झाला असून यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. याच खड्ड्यांमुळे गतिरोधकासारखा भाग या ठिकाणी तयार झाला आहे.
या गती रोधकावर भरधाव वेगात आलेल्या वाहनांना अंदाज न आल्यामुळे या ठिकाणी वाहने जोरात आदळत आहेत. याचा मोठा आवाज आसपासच्या घरातसुद्धा ऐकू येत आहे. सोमवारी सायंकाळी याच ठिकाणावर एक कार आदळली व तिचा टायर फुटल्याने चालकाने गाडी रस्त्याच्याकडेला उभी केली. यावेळी सुरूर येथील तीन युवकांनी पहिले व आपल्या तीन दुचाकी सेवा रस्त्यावर पार्क करून कार चालकाजवळ गेले. त्या गाडीचा टायर बदलून गाडी मार्गस्थ करीत होते.
याच दरम्यान या ठिकाणापासून ५० मीटर अंतरावर पाठीमागून आलेली पोलीस गाडी या याच ठिकाणी गतिरोधकासारख्या भागावर आदळल्याने गाडीचा पाठीमागील डाव्या बाजूचा टायर फुटला. त्यामुळे चालकाला गाडी अनियंत्रीत झाल्याने गाडी १० फूट खोल आदळली व तशीच पुढे जाऊन उभ्या असलेल्या दुचाकीवर आदळली. यामध्ये तीन दुचाकीचे आणि पोलीस गाडीचे मोठे नुकसान झाले. या अपघातात मदत करण्यासाठी गेलेला सुरूर येथील युवक गणेश वाघमारे हा जखमी झाला.युवक आंदोलनाच्या तयारीत...या आठवड्यातील हा चौथा अपघात असल्याने युवकांमध्ये संतापाची लाट उसळली असून या ठिकाणचा महामार्ग दुरुस्ती करण्यासाठी आंदोलन करण्याच्या तयारीत सुरूर येथील युवक आहेत. अपघातात नुकसान झालेल्या दुचाकींची भरपाई मिळावी, अशी मागणी युवकांनी केली आहे.