कुसूर : कऱ्हाड-ढेबेवाडी मार्गावरील विंग येथे उंचीरोधक लोखंडी खांब बसविण्यात आले आहेत. मात्र, रिफ्लेक्टर अथवा कोणताही सूचना फलक संबंधित ठेकेदाराकडून लावण्यात आला नसल्याने हे खांब वाहनधारकांसाठी काळ बनत आहेत. रस्त्यात उभारण्यात आलेल्या या खांबांमुळे अनेकांना अपघाताचा सामना करावा लागला आहे.
कऱ्हाड-ढेबेवाडी मार्गावरील विंग येथून कऱ्हाड-चिपळूण मार्गावरील साकुर्डी फाटा ते मलकापूर मार्गाला भेदून कालेमार्गे शेणोलीतील तासगाव रस्त्याला हा रस्ता जोडला जातो. काही महिन्यांपूर्वी या मार्गाला राज्यमार्गाचा दर्जा मिळाला आहे. येरवळे मार्गे विंग गावातून हा मार्ग जात असल्याने ढेबेवाडी मार्गावर चौक तयार झाला आहे. या चौकातून चारी बाजूला जाणाऱ्या मार्गावर संबंधित विभागाकडून उंचीरोधक लोखंडी खांब उभे-आडवे लावून कमान करण्यात आली आहे.
ढेबेवाडी चौपदरी मार्गाचा ज्यावेळी आराखडा तयार करण्यात आला होता, त्यावेळी या चौकात उड्डाण पूल नियोजित होता. परिणामी या ठिकाणावरील दोनशे ते तीनशे मीटर अंतर सोडून रस्ता करण्यात आला होता. मात्र हा नियोजित पूल न होता पुन्हा सलग रस्ता जोडला गेला. अगोदर तयार करण्यात आलेल्या मार्गाच्या मध्यभागी दुभाजक तयार करण्यात आले आहेत, तर या चौकात दुभाजक नाहीत. त्यामुळे सुसाट येणाऱ्या वाहनधारकांना रस्त्याच्या मध्यभागी रिफ्लेक्टर अथवा सूचना फलक न लावलेले खांब सहज निदर्शनास येत नाहीत. परिणामी, या खांबांना धडक होऊन अपघात होण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. याची संबंधित विभागाने गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी वाहनधारकांन मधून होत आहे.
- चौकट
ठेकेदाराचा वेळकाढूपणा बेततोय जिवावर
उंचीरोधक लोखंडी खांब बसविण्याचे काम सध्या पूर्ण झाले असले तरी गत दीड वर्षापासून हे काम रेंगाळले होते. ठेकेदाराच्या वेळकाढू वृत्तीमुळे आजही खांब उभे करण्यासाठी काढण्यात आलेले खड्डे बुजविण्यात आलेले नाहीत. तसेच रस्त्याच्या मध्यभागी उभ्या करण्यात आलेल्या लोखंडी खांबांना रंगरंगोटी, रेडियम अथवा रिफ्लेक्टर लावण्यात आलेले नाहीत. रात्री हे खांब निदर्शनास येत नसल्याने अपघात होत आहेत.
फोटो : २१केआरडी०१
कॅप्शन : कऱ्हाड ते ढेबेवाडी मार्गावर विंग, ता. कऱ्हाड येथे उंचीरोधक लोखंडी खांबांची कमान उभारण्यात आली असून ही कमान सध्या अपघातांना निमंत्रण देणारी ठरत आहे. (छाया : गणेश काटेकर)