कऱ्हाड : शहरातील मुख्य चौकासह अंतर्गत भागात अनेक ठिकाणी नवीन इमारतींची बांधकामे केली जात आहेत. इमारत बांधकामासाठी आणण्यात आलेली खडी व वाळू रस्त्यावरच टाकली जात असल्याने दुचाकी घसरून अपघात घडत आहेत. त्यामुळे बांधकाम साहित्य रस्त्यावरून हटविण्याची गरज आहे.
विद्यानगरमध्ये कचरा
कऱ्हाड : विद्यानगर परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत़ ओला व सुका कचरा विखुरल्यामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण होऊन लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.
वन्यप्राण्यांचा उपद्रव
सणबूर : पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागात सध्या तरस, लांडगा, रानडुक्करांचा उपद्रव वाढला आहे. या प्राण्यांकडून पिकांचे नुकसान होत आहे. प्राण्यांना हुसकावण्यासाठी ग्रामस्थांना पिकांची राखण करावी लागत असल्याची परिस्थिती आहे. वनविभागाने प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
उकाड्यात वाढ
कऱ्हाड : उन्हाचा तडाखा जाणवत असतानाच मंगळवारी सायंकाळी तालुक्यात वळीव पावसाने हजेरी लावली. तालुक्याच्या बहुतांश भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे वातावरणात काही प्रमाणात गारवा निर्माण झाला होता. मात्र, बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने उकाड्यात वाढ झाली असून नागरिक हैराण झाले आहेत.