सातारा : शेतीची तसेच इतर कामे करताना शेतकऱ्यांचा मृत्यू होतो किंवा त्यांना अपंगत्व येते. याचा विचार करून राज्य शासनाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू केली असून, मागील वर्षभरात दाखल १७६ पैकी ७५ प्रस्तावच मंजूर झाले आहेत, तर ९४ प्रलंबित असून, ७ नामंजूर आहेत. त्याचबरोबर १९ मध्ये त्रुटी काढण्यात आल्या आहेत.
दरवर्षी विविध अपघातात अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू होतो. तसेच काहींना अपंगत्व येते. घरातील कर्त्या माणसाचा अनैसर्गिक व अकाली मृत्यू झाल्याने अल्पभूधारक कुटुंबाला हलाखीच्या परिस्थितीला सामोरे जावे लागते. यासाठी राज्याने सर्व शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लाभ मिळण्यासाठी अपघातग्रस्ताच्या नावे शेतजमीन असणे आवश्यक आहे. तसेच अपघातावेळी त्यांचे वय १० ते ७५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक असते. तसेच शेतकऱ्याला अपंगत्व किंवा मृत्यू हा कोणत्याही प्रकारच्या अपघातानेच येणे आवश्यक आहे.
.........................
चौकट :
कोणाला किती मिळते मदत...
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेंतर्गत शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये मदत कुटुंबीयांना मिळते, तर अपंगत्व आल्यास एक लाखाचे विमा संरक्षण देण्यात आलेले आहे. विविध अपघातांसाठी ही विमा योजना राबविण्यात येते. विहीत कालावधीतील प्रत्येक दिवसाच्या २४ तासांसाठी ही योजना लागू असते. तसेच संबंधित कालावधीत केव्हाही अपघात झाला तरी योजनेसाठी तो पात्र ठरतो.
...............................................
या अपघातासाठी मिळते मदत...
विमा योजनेंतर्गत विविध अपघातांसाठी मदत मिळते. यामध्ये रस्ता, रेल्वे अपघात झाल्यास शेतकरी तसेच त्याच्या कुटुंबीयांना विमा रक्कम देण्यात येते. त्याचबरोबर पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशक किंवा अन्य कारणाने विषबाधा, विजेचा धक्का, वीज पडून मृत्यू, उंचावरून पडून झालेला अपघात व मृत्यू, सर्प आणि विंचू दंश, नक्षलवाद्यांकडून झालेली हत्या, जनावरांच्या चावण्याने रेबिज होऊन मृत्यू, जनावरांच्या हल्ल्यात मृत्यू, आदींमध्ये विमा योजनेचा लाभ मिळत असतो.
.........................................................
चौकट :
सर्वाधिक प्रकरणे रस्ते अपघाताची
शेतकऱ्यांना अपघात विमा योजना लागू केली आहे. २०२० या वर्षात सर्वाधिक शेतकऱ्यांचा मृत्यू हा रस्ते अपघातात झाला आहे, तर विमा योजनेंतर्गत १८ प्रकरणे रस्ता अपघाताची मंजूर झाली आहेत. यानंतर विजेच्या धक्क्याने मृत्यू किंवा अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांचे १२ प्रस्ताव मंजूर झाले आहेत. यानंतर पाण्यात बुडून मृत्यू ७, सर्पदंश ३ आणि अन्य अपघातातील ३ प्रस्ताव मंजूर आहेत.
...................
२०२० वर्षात तालुकानिहाय विमा कंपनीस सादर प्रस्ताव आणि मंजूर प्रस्ताव
सातारा १८ ८
कोरेगाव १९ ९
खटाव २७ १३
कऱ्हाड २२ ५
पाटण १० ६
वाई १९ ८
जावळी १० ५
महाबळेश्वर २ १
खंडाळा ७ ४
फलटण १९ १०
माण २३ ६
..........................................................