महाबळेश्वर : मेटगुताड बसथांब्यासमोर महाबळेश्वर-पाचगणी रस्त्यावर बुधवारी सायंकाळी झालेल्या दोन दुचाकी अपघातातील एका जखमीचे रुग्णालयात मृत्यू झाले. या अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात दुचाकीस्वारावर महाबळेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध घेतला जात आहे .
महाबळेश्वरपासून सात किलोमीटर अंतरावर बुधवारी सायंकाळी दोन दुचाकींचा समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात इमाम बुढेसाब बावेकट्टी (वय ४०, रा. पावर हाऊस, पाचगणी) व पैगंबर इमाम औटी (४५, रा. भीमनगर, पाचगणी) हे दोन दुचाकीस्वार जखमी झाले होते. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मेटगुताड ग्रामस्थांनी महाबळेश्वर व पाचगणी येथील रुग्णवाहिकेला फोन केला. मात्र रुग्णावाहिका नसल्याने महाबळेश्वर ट्रॅकर्सचे अध्यक्ष अनिल केळगणे यांनी आपल्या खासगी वाहनातून जखमींना पाचगणी येथील बेल एअर रुग्णालयात दाखल केले. परंतु तेथे जखमींना दाखल करून घेण्यास नकार देण्यात आला. अनिल केळगणे यांनी जखमींवर प्रथोमपचार करण्याची मागणी केली. मात्र वाहनातच जखमींवर उपचार करण्यात आले. त्यानंतर केळगणे यांनी जखमींना पुढील उपचारासाठी वाई येथे हलविण्यात आले. वाई येथे उपचार सुरू असताना जखमींपैकी इमाम बुढेसाब बावेकट्टी यांचा मृत्यू झाला. या अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल केला आहे.