शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिरवळ गावच्या हद्दीमध्ये असणाऱ्या जुन्या एमआयडीसीमध्ये असणाऱ्या एका कंपनीच्या मागील बाजूला असणाऱ्या भंगाराच्या गोडाऊनला अचानकपणे लागलेल्या आगीमध्ये टेम्पोसहित साहित्य बेचिराख झाले. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, अज्ञाताने सुक्या गवतामध्ये पेटती सिगारेट टाकल्याने ही घटना घडली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शिरवळ, ता.खंडाळा गावच्या हद्दीमध्ये शिरवळ-पळशी रस्त्यावर एका खासगी कंपनीच्या मागील बाजूला मोहनलाल भानुशाली यांच्या मालकीचे भंगाराचे साहित्य ठेवण्याकरिता गोडाऊन आहे. या गोडाऊनला रविवार, दि.२७ मार्च रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास गोडाऊन परिसरात असणाऱ्या सुक्या गवताला अचानकपणे आग लागली.ही आग पसरत गोडाऊनपर्यंत पोहोचली. क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले. यावेळी आगीमुळे मोठ्या प्रमाणात धुरांचे लोट निर्माण झाले. आकाशामध्ये धुरांचे लोट पसरत संपूर्ण परिसर धुराने दाटून गेले होते. शिरवळ येथील एमआयडीसी परिसरात असणाऱ्या एशियन पेट्स, भोर नगरपरिषद लॉकीम गृपच्या अग्निशमन बंबांनी तब्बल तीन तासांच्या अथक परिश्रमाने आग आटोक्यात आणली.दरम्यान, या आगीमध्ये भंगाराच्या साहित्यासह टेम्पोही जळून खाक झाला. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शिरवळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत शिरवळ पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली नव्हती.
शिरवळ येथे भंगारच्या गोडाऊनला भीषण आग, सिगारेटमुळे दुर्घटना घडल्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 7:21 PM