सातारा : रात्रगस्तीवर असलेल्या सातारा पोलिसांच्या गाडीला अपघात होऊन तीन पोलीस किरकोळ जखमी झाले. जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. हा अपघात शुक्रवारी मध्यरात्री खेड फाटा परिसरात झाला.याबाबत अधिक माहिती अशी, शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक पवार यांच्यासह पाच कर्मचारी पोलीस गाडीतून महामार्गावर रात्रगस्त घालत होते. खेड फाटा परिसरातून जात असताना पुढे चाललेल्या टँकरला पोलीस गाडीने पाठीमागून जोरदार धडक दिली.
यामध्ये पोलीस उपनिरीक्षक पवार, चालक माने आणि गार्ड ओंमकार डुबल हे किरकोळ जखमी झाले. या अपघातानंतर जखमी कर्मचाऱ्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना रुग्णालयातून तत्काळ घरी सोडण्यात आले. अपघातामध्ये पोलीस गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे चालकाला अंदाज न आल्यामुळे हा अपघात झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.