कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या भोसे येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांची सहल घेऊन गेलेल्या कोरेगाव आगाराच्या बसला रायगड जिल्ह्यात म्हसळा येथे अपघात झाला. या अपघातात कोणीही जखमी झाले नसले तरी एसटीचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी म्हसळा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
एसटी महामंडळाच्या कोरेगाव आगारातून बस (एमएच १४ बीटी ४६२४) ही गुरुवारी सकाळी शैक्षणिक सहलीसाठी प्रासंगिक करारावर देण्यात आली होती. चालक विशाल उंबरदंड हे बस घेऊन भोसे येथून सकाळच्या सुमारास कोकणाकडे मार्गस्थ झाले. दिवसभर विद्यार्थ्यांनी कोकण दर्शन केल्यानंतर रात्री मुक्कामासाठी विद्यार्थ्यांना घेऊन बस म्हसळा येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे पोहोचली.
सर्व विद्यार्थ्यांना सोडल्यानंतर चालक व शिक्षक हे जेवणासाठी हॉटेलवर गेले होते. जेवण करुन परतल्यानंतर बस पार्किंग करत असताना पाठीमागे घेतली जात होती, तेव्हा ती नाल्यात कोसळली. त्यामध्ये बसच्या पाठीमागील बाजूच्या बंपरचे मोठे नुकसान झाले. त्यात पत्रा फाटला आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी गर्दी केली. चालकाने मद्यपान केले असल्याचा संशय आल्याने त्यांनी स्थानिक पोलिसांना पाचारण केले आणि पोलिसाने चालकाला ताब्यात घेतले. एसटी महामंडळाच्या श्रीवर्धन आगारातून पर्यायी बस आणि चालक उपलब्ध करुन देण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी सर्व विद्यार्थी आणि शिक्षक उर्वरित सहलीसाठी रवाना झाले. शनिवारी सकाळी ते भोसे येथे पोहोचणार आहेत.
...म्हणून विद्यार्थी बचावले
भोसे येथील सर्व विद्यार्थ्यांनी कोकण दर्शनाचा आनंद घेतला. रात्री उशीर झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना मुक्कामासाठी म्हसळा येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे सोडण्यात आले होते. तदनंतर सुमारे दीड तासानंंतर अपघाताची घटना घडली आहे. या अपघाताचे वृत्त कोरेगाव तालुक्यात आणि भोसे गावात पसरल्यानंतर एकच खळबळ उडाली. दैव बलवत्तर म्हणून विद्यार्थी बचावले असून, एस. टी. प्रशासनाने चालकाविरोधात कारवाईस सुरुवात केली आहे.