निकिता दत्तात्रेय जमाले (वय १८, रा. मुंढे, ता. कराड) असे जागीच ठार झालेल्या युवतीचे नाव आहे. अपघातस्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंढेतील निकिता जमाले ही गावातीलच मैत्रिणीसह एका वाहनाने पुणे येथे सैनिकभरतीसाठी गेली होती. पुणे येथील काम आटोपून रविवारी रात्री त्या दोघी परत निघाल्या. संबंधित वाहनचालक मुलींना ज्यांच्या त्यांच्या गावाच्या थांब्यावर सोडत कराडकडे निघाला होता. रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास पुणे-बंगळूर महामार्गावर गोटेगावच्या थांब्यावर निकितासह गावातील तिची मैत्रीण उतरली. तत्पूर्वी निकिताने तिच्या भावाला फोन करून गोटेतील थांब्यावर बोलवून घेतले हाेते. तो दुचाकीवर महामार्गाच्या दुस-या बाजूला उभा होता. वाहनातून उतरल्यानंतर निकिता व तिची मैत्रीण सातारा-कोल्हापूर लेनवर महामार्ग ओलांडून पश्चिमेकडे जात होत्या. महामार्ग ओलांडताना दोघींमध्ये ताळमेळ न झाल्याने एकजण पुढे पळाली, तर निकिताला भरधाव अज्ञात कारने धडक दिली. या धडकेत ती जागीच ठार झाली. आपघात घडताच निकिताच्या मैत्रिणीसह भावाने आरडाओरडा केला. परिसरातील युवकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची माहिती मिळताच जवळच वास्तव्यास असलेले महामार्ग देखभाल विभागाचे दस्तगीर आगा त्याठिकाणी धावले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. कराड शहर पोलीस ठाण्याचे हवालदार प्रशांत जाधव व खलिल इनामदार तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघातस्थळाचा पंचनामा केला.
- चौकट
भावासमोरच बहिणीचा अंत
महामार्ग ओलांडताना निकिता व तिची मैत्रीण दोघींमध्ये ताळमेळ झाला नाही. यावेळी महामार्गावरून भरधाव कार आली होती. कारचालक डीपर लाइट देत होता. भावाने निकिताला थांब, गाडी आली, अशी हाक दिली. मात्र, क्षणार्धातच एकजण पुढे पळाली. तर, निकिताला त्या भरधाव कारने धडक दिली. धडक एवढी जोरात होती की, निकिताचा भावाच्या डोळ्यांदेखत जागीच मृत्यू झाला.
- चौकट
देशसेवेचे स्वप्न अधुरेच राहिले
मुंढे येथील निकिता जमाले या युवतीने देशसेवेत सहभागी होण्याची जोमात तयारी केली होती. अनेक महिन्यांपासून ती कसून सराव करत होती. रविवारी पुणे येथील सैनिकभरतीची प्रक्रिया करून घरी परतत असताना तिच्यावर काळाने घाला घातला, त्यामुळे तिचे देशसेवेचे स्वप्न अधुरेच राहिले.
फोटो : १८ निकीता जमाले