सातारा : पुण्याहून साताऱ्याकडे येत असताना येथील लिंबखिंडजवळ भरधाव कारने दिलेल्या धडकेत दोन युवक जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास झाला.रामनरेश सोपान यादव (वय ३०, रा. सत्वशीलनगर, सातारा. मूळ रा. उत्तरप्रदेश), हर्षद कुशल वैरे (वय २४, रा. भूविकास बँक परिसर) अशी जखमींची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रामनरेश आणि हर्षद हे दोघे दुचाकीवरून पुण्याला मित्राला भेटण्यासाठी गेले होते.
बुधवारी सकाळी ते दुचाकीवरून साताऱ्याकडे यायला निघाले. येथील लिंबखिंड परिसरात आल्यानंतर भरधाव कारने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, दोघेही दुचाकीवरून उडून दूरवर फेकले गेले. त्यामुळे दोघांनाही गंभीर जखम झाली.
पाठीमागून येणाऱ्या जीपने काही नागरिकांनी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, अपघातानंतर कारचालक कारसह तेथून पसार झाला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.२