सातारा : सातारा नगरपालिकेच्या लेखापाल शबनम शेख यांची अखेर सहसंचालक वित्त व कोषागार विभाग कार्यालय, पुणे येथे सक्तीची बदली करण्यात आली. याबाबतचा आदेश वित्त व कोषागार संचालनालयाच्या सहायक संचालक दीपा पाटील यांनी काढला आहे. शबनम शेख यांची पाच महिन्यांपूर्वी सातारा पालिकेत लेखापाल म्हणून नियुक्ती झाली होती. काही महिन्यांनंतर त्यांच्याविरुद्ध तक्रारी वाढू लागल्या. सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र वाडकर यांनीदेखील शेख यांच्याविरुद्ध ठेकेदारांची बिले काढताना टक्केवारी मागितली जात असल्याची लेखी तक्रार जिल्हा प्रशासनाकडे नोंदवली होती. या प्रकरणावरून शबनम शेख यांची पालिकेत गोपनीय चौकशी सुरू होती. या चौकशीदरम्यान शेख यांचा कार्यभार काढून घेण्यात आल्याच्या चर्चेलादेखील पाय फुटले होते. प्रशासक तथा मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी शेख यांची सुनावणी घेऊन त्या संदर्भातील सविस्तर अहवाल वित्त व कोषागार विभागाचे मुख्य सचिव एन. रामास्वामी यांना पाठवला होता. या प्रकरणाची वित्त विभागाने गंभीर दखल घेऊन शबनम शेख यांची वित्त व कोषागारे सहसंचालक कार्यालय, पुणे येथे सक्तीने बदली केली.सातारा पालिकेचे लेखा परीक्षक महेश सावंत यांच्याकडे लेखापाल पदाचा प्रभारी कार्यभार सोपविण्यात आला आहे. लेखापालांविरुद्ध करण्यात आलेल्या तक्रारी व सुनावणीमुळे सातारा पालिकेची अर्थसंकल्पीय सभा लांबणीवर पडली होती. या सभेचा मार्गही आता मोकळा झाला आहे.
सातारा पालिकेच्या लेखापाल शबनम शेख यांची बदली, महेश सावंत यांच्याकडे प्रभारी कार्यभार
By सचिन काकडे | Published: February 27, 2024 4:54 PM