संजय पाटील, कऱ्हाड : वनवासमाची, ता. कऱ्हाड येथे युवकाचा खून करुन पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न झाला होता. या खुनातील मृताची ओळख पटली असून खुनप्रकरणी पोलिसांनी मुख्य सुत्रधाराला अटक केली आहे. तर खून करुन मृतदेह जाळताना एक आरोपीही गंभीररीत्या भाजून जखमी झाल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. त्या आरोपीवर सातारच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.
केशवमुर्ती आर. चिन्नाप्पा रंगास्वामी (वय ३७, रा. आरेहल्ली पो. मायासिंद्रा, ता. अनकेल, जि. बंगळुरू) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर मंजुनाथ सी (३३, रा. आरेहल्ली) याला पोलिसांनी अटक केले आहे. आरोपी मंजूनाथ याला पोलिसांनी सोमवारी न्यायालयात हजर केले असता फौजदारी न्या. एस. ए. विरानी यांनी त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, केशवमुर्तीच्या खूनानंतर त्याचा मृतदेह जाळताना प्रशांत भिमसे बटवाल (रा. वमनेल-सिंगदी, जि. बिजापूर) हा आरोपी भाजला आहे. त्याचा पाय व हात जळाला असून त्याच्यावर उपचार सुरू असल्यामुळे त्याला अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगीतले. कऱ्हाड तालुक्यातील वनवासमाची येथे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकाम सुरू असलेल्या गटरमध्ये २९ सप्टेंबर रोजी पहाटे युवकाचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता.