कऱ्हाड : गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीने पोलिस कोठडीत स्वत:वर टोकदार शस्त्राने वार करून घेऊन तसेच भिंतीवर डोके आपटून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात गुरुवारी, (दि. ४) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. सोनू उर्फ संजीव कपूरसिंग टाक (वय २८, रा. हडपसर, गाडीतळ, तुळजाभवानी वसाहत, ससाणेनगर, पुणे) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये आरोपी सोनू उर्फ संजीव टाक याला न्यायालयाच्या आदेशानुसार वर्ग करण्यात आले होते. आरोपी टाक हा येरवडा कारागृहात होता. न्यायालयाकडील ट्रान्सफर वॉरंटवरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन गुरूवारी सायंकाळी कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात आणले. त्या ठिकाणी त्याला अटक करण्यात आले. तसेच लॉकअपमध्ये ठेवण्यात आले. लॉकअपमध्ये जमा करताना तेथील पोलिस कर्मचाऱ्यांनी आरोपी टाक याची अंगझडती घेतली. मात्र, त्याच्याकडे काहीही आढळून आले नाही. त्यानंतर त्याला लॉकअपमध्ये ठेवण्यात आले. त्यानंतर रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास लॉकअपमध्ये आरोपी सोनू उर्फ संजीव टाक याने बाथरूममध्ये डोके आपटण्यास सुरुवात केली.हा प्रकार निदर्शनास येताच पोलिसांनी धाव घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने स्वत:च्या पोटावर टोकदार वस्तूने जखमा करून घेतल्याचे आढळून आले. तसेच भिंतीवर डोके आपटल्याने डोक्यालाही जखम झाली होती. पोलिसांनी त्याला तातडीने वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस उपनिरीक्षक मारुती चव्हाण तपास करीत आहेत.
Satara: टोकदार वस्तूने पोटावर वार, पोलिस कोठडीत आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न
By दीपक शिंदे | Published: October 09, 2023 6:40 PM