दत्ता यादव।सातारा : जिल्हा शासकीय रुग्णालयातील कैद्यांच्या वॉर्डमध्ये आरोपींनी केलेला डान्स एका पोलिसाच्या नोकरीवर तर तिघांच्या खातेनिहाय चौकशीवर बेतला असतानाच या ठिकाणी ‘हम नही सुधरेंगे’ अशीच स्थिती असल्याचे बुधवारी दुपारी पाहायला मिळाले. ‘प्रिझन वॉर्ड’च्या समोरील खिडकीतून आतील आरोपींशी बिनधास्तपणे गप्पा मारणारे बाहेरील काही कार्यकर्ते ‘लोकमत’च्या कॅमेºयात कैद झाले.
सुरुचि धुमश्चक्री प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर दोन्ही राजेंच्या कार्यकर्त्यांनी चक्क एकत्र येऊन ‘प्रिझन वॉर्ड’मध्ये डान्स केला होता. या प्रकरणात एका पोलिसाला आपल्या नोकरीवर पाणी सोडायला लागले तर इतर पोलिसांवर चौकशीची टांगती तलवार आहे.
या पार्श्वभूमीवर या वॉर्डची सध्या स्थिती काय आहे? हे पाहण्यासाठी बुधवारी दुपारी एक वाजता ‘लोकमत’ टीम तेथे पोहोचली. त्यावेळी कैद्यांच्या वॉर्ड परिसरात सुरू असणारा ‘आओ जाओ घर तुम्हारा’ प्रकार अजूनही थांबला नसल्याचे दिसून आले.
कैद्यांच्या खोलीजवळ समोरील खिडकीतून आतील आरोपींशी बाहेरील कार्यकर्ते बिनधास्तपणे सुमारे पंधरा मिनिटे गप्पा मारत होते. तर या ठिकाणी बंदोबस्ताला असणारे दोन पोलिस आपल्याला काहीच माहीत नसल्याच्या अविर्भावात आतमध्ये निघून गेले. बराच वेळ चर्चा झाल्यानंतर आरोपींशी चर्चा करणारे कार्यकर्तेही निघून गेले. त्यानंतर काही वेळात एक कार तेथे आली. ही कार चक्क प्रिझन वॉर्डसमोरच उभी करण्यात आली. त्यातून तीन ते चार कार्यकर्ते उतरले. थेट प्रिझन वॉर्डमध्ये गेले. त्यांच्यासोबत एक पोलिस कर्मचारीही होता. काहीवेळ आतील आरोपींशी चर्चा झाल्यानंतर कारमध्ये बसून सर्वजण निघून गेले.
दरम्यान, बंदोबस्तावरील काही पोलिस आणि आरोपींचे कसे लागेबांधे असायचे, याची थरारक कहाणीच संबंधित महिला कर्मचाºयाने ‘लोकमत’जवळ कथन केली. या खोलीत संपूर्ण महिनाभर सतत डान्सचा धुमाकूळ घातला जात होता. याची तक्रारही सिव्हिलच्या काही कर्मचाºयांनी यापूर्वी थेट वरिष्ठ पोलिस अधिकाºयांकडे केली होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट केला. ती म्हणाली, ‘एके दिवशी तर इथं बंदोबस्तावरील काही कर्मचारी चक्क पिऊन आले होते. कैद्यांच्या वॉर्र्डाचा दरवाजा सताड उघडा होता. एखादा आरोपी पळून गेला तर बिचाºयांची नोकरी जाईल, या काळजीपोटी आम्हीच त्यांच्या लॉकअपला कुलूप घातलं. तरीही ते लवकर शुद्धीवर आले नव्हते. हे तर काहीच नाही. काही पोलिस आरोपींच्या डब्यात जेवत असत. आरोपी अनेकदा पोलिसांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळही करत होते. पोलिस मात्र निमूटपणे मान खाली घालून बसत. रात्रीच्या सुमारास तर आरोपींच्या वॉर्डमधून डान्सचा आवाज यायचा. प्रचंड दंगा केला जायचा. एका गार्डमुळं हे सर्व घडत होतं. त्यामुळे एके दिवशी थेट एसपींना फोन केला.’दबावामुळेच ‘राजकीय’ आजारपणसुरुचि धुमश्चक्री प्रकरणात अटक झाल्यानंतर अनेक आरोपी आजारपणाची वेगवेगळी कारणे सांगून सिव्हिलमध्ये दाखल झाले. त्यानंतर काही आरोपींनी कैद्यांच्या वॉर्डमध्ये ‘डान्स’ केल्याचे समोर आल्यानंतर आजारी असणारे आरोपी लगेच धडधाकट झाले कसे? असा प्रश्न उपस्थित झाला. याचाही ‘लोकमत’ टीमने शोध घेतला असता धक्कादायक किस्से समोर आले.नाव न सांगण्याच्या अटीवर वरिष्ठ डॉक्टरांनी आपल्या मनातील खदखद अखेर बोलून दाखविलीे, ‘त्यांचं आजारपण काय आहे, हे आम्हाला चांगलं माहिती आहे. मात्र इकडे आड तिकडे विहीर, अशी आमची अवस्था आहे. ‘यांचा’ही फोन येतो आणि ‘त्यांचा’ही. तेच सांगतात.. हा आजार दाखवा, तो आजार सांगा. बोला, काय करणार आम्ही?’‘डान्स’चा तो व्हिडीओ न्यायालयात सादरपोलिसांकडून जामीन नामंजूर करण्याची मागणीसातारा : सुरुचि धुमश्चक्री प्रकरणातील संशयित आरोपींनी जिल्हा रुग्णालयात केलेल्या डान्सचा व्हायरल झालेल्या व्हिडिओ प्रकरणाचा अहवाल पोलिसांनी न्यायालयात सादर केला. सुनावणीदरम्यान, सरकारी पक्षाने जामीन नामंजूर करण्याची मागणी केली. मात्र, न्यायालयाने निर्णय दि. २५ रोजी निकालावर ठेवण्यात आला आहे.सुरुचि धुमश्चक्री प्रकरणात अटकेत असलेल्या खासदार व आमदार गटाच्या समर्थकांनी आजारी असल्याचे कारण देऊन जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. दरम्यान, सोमवारी त्यांना जिल्हा न्यायायालयाने तात्पुरता जामीन मिळाल्याच्या आनंदात संशयितांनी रात्रभर रुग्णालयात डान्स केला. या डान्सचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी राजलक्ष्मी शिवणकर यांना चौकशी करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी जिल्हा रुग्णालयातील आरोपींच्या खोलीची झाडाझडती करत मोबाईल, कॅरम, ब्ल्यू थूट व स्पीकर जप्त केले. तसेच एका पोलिस कर्मचाºयास निलंबित केले.पोलिसांनी डान्स प्रकरणाची चौकशी करून तसा अहवाल बुधवारी न्यायालयात दाखल केले. त्याचबरोबर व्हायरल झालेला व्हिडीओ, रुग्णालयातील आरोपी केसपेपर, वृत्तपत्रांची कात्रणे सादर केली. तसेच सरकारी पक्षाने संशयित आरोपींना कायदे भय नसल्याने ते असे वर्तन करत आहेत. आजारी असल्याचा बनाव करून वैद्यकीयसुविधांचा गैरवापर करत आहेत. त्यामुळे अशा आरोपींचा जामीन नामंजूर करावा, अशी मागणी केली.जिल्हा शासकीय रुग्णालयातील ‘प्रिझन वॉर्ड’च्या समोरील खिडकीजवळ उभे राहून कार्यकर्ते बुधवारी दुपारी आरोपींशी चर्चा करत होते.सिव्हिलच्या महिला कर्मचाºयाकडून गौप्यस्फोट